Marathwada Rain : छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी वाळूज औद्योगिक वसाहतीत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. पावसामुळे संपूर्ण औद्योगिक वसाहतीतील रस्ते जलमय झाले असून, अनेक कंपन्यांमध्येही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून, याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर संततधार पाऊस आणि धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 1 लाख 13 हजार 184 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार उडविला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२७) पुन्हा एकदा बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांवर पावसाने कहर केला. विभागातील १४१ मंडळात अतिवृष्टी झाली. पुन्हा झालेल्या भरपूर पावसाने या सहाही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. उरलं सुरलं पिकही शनिवारच्या पावसाने जमीनदोस्त झाली. नांदेड-हैदराबाद मार्ग बंद पडला आहे. तर हिमायनगर तालुक्यात वीज कोसळून गाय गंभीर तर वासराचा जागीच मृत्यू झाला आहे. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून पांडुरंग निवृत्ती कदम (वय ४७) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मन्याड व विष्णुपुरी धरणातून झालेला विसर्ग आणि २६ च्या रात्री व २७ सप्टेंबरला झालेला मुसळधार पाऊस यामुळे गोदावरी, मन्याड नदीने रौद्र रूप धारण केले. उदगीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे १३ गावांचा तुटला संपर्क आहे.