

Marathwada Heavy Rain agriculture loss
कळंब, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतजमिनी, पिके, जनावरे, घरे आणि उपजीविकेची साधने पुरामुळे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफी आताच जाहीर करावी. पूरग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा युबीटी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
कळंब तालुक्यातील ईटकूर परिसराला (जि. धाराशिव) भेट देऊन श्री. ठाकरे यांनी गुरुवारी (दि. २५) परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी संवादादरम्यान बँकांकडून येणाऱ्या कर्जफेडीच्या नोटिसा आणि फोनची तक्रार मांडली. यावर ठाकरे म्हणाले, "शेतकऱ्यांना जखमा भरायला वेळ मिळावा, तोवर कर्जफेडीच्या नोटिसा देऊन बँका अधिक त्रास देत आहेत. अशा नोटिसा माझ्याकडे पाठवा, मी त्या थेट मुख्यमंत्र्यांना पोहोचवतो. या संकटसमयी तुम्ही खचून जाऊ नका. मी आणि माझी शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहोत."
या दौऱ्यात ठाकरे यांच्यासोबत खा. संजय राऊत, विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. मिलिंद नार्वेकर, माजी खा. चंदकांत खैरे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. प्रवीण स्वामी, आ. कैलास पाटील, माजी आ. दयानंद गायकवाड, रणजित बागल, धीरज पाटील, तालुकाप्रमुख सचिन काळे, कांचनमाला संगवे, विजय सस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने आदींसह शेकडो शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.