उमेश काळे
छत्रपती संभाजीनगर : वसमत गोळीबारामुळे मराठवाडा विकासाचे आंदोलन पेटले. शिष्यवृत्ती वाढ, वैधानिक मंडळे, रेल्वे रूंदीकरण या व अनेक मागण्या आंदोलकांच्या होत्या. त्यात एक प्रमुख राजकीय मागणीही होती, ती म्हणजे मराठवाडा विभागातील नेत्याला मुख्यमंत्री करण्यात यावे..
अर्थात त्यावेळी शंकरराव चव्हाण हेच मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्याशिवाय दुसरा लायक नेताही पदासाठी नव्हता. यशवंतराव चव्हाण हे केेंद्रात गेल्यानंतर मारोतराव कन्नमवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले होते. दुर्देवाने वर्षभरानंतर त्यांचे निधन झाल्याने वैदर्भिय नेते वसंतराव नाईक यांना चव्हाण यांनी आपले वारसे निवडले. नाईक जवळपास 11 वर्षापेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री होते. परंतु प्रदीर्घ काळ या पदावर राहिल्यामुळे काँग्रेस पक्षातील मंडळींमध्ये धुसफूस सुरू झाली. त्यालाही पुन्हा जातीय रंग आलाच. त्यातच मराठवाड्याचे आंदोलन भडकले.
1972 नंतरचा काळ असा होता की, देशातील युवकांमध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारीविरोधात मोठ्या प्रमाणात जागृत्ती होत होती. 1974 ला बिहारात जयप्रकाश नारायण यांच्या नेत्तृत्वाखाली भ्रष्ट राजवटीविरूद्ध मोठे आंदोलन उभे राहिले. गुजरातेत झालेल्या नवनिर्माण आंदोलनामुळे तत्कालिन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांना 3 फेबु्रवारी, 1974 ला राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्रातील एका प्रदेशात आंदोलन होत असल्याची वंदता इंदिराजींपर्यंत पोहचल्याने त्यांनाही काहीतरी निर्णय घेणे भाग होते. मराठवाड्यापुरते असणारे आंदोलन राज्यभर पसरले काय होईल, ही त्यांना भीती होती. त्यातच बाळासाहेब पवार, बाबूराव काळे या मराठवाड्यातील नेत्यांनी मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी लावून धरली.
विकास आंदोलनात त्या काळी सक्रिय असणारे कार्यकर्ते डॉ. मनसुख आचलिया या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, की आंदोलकांच्या मागण्यांबाबत वसंतराव नाईक यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलाविले. दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढ 30 रूपयांवरून 300 करावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. पण ही वाढ महागाई भत्त्यानुसार केली पाहिजे, असे मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो. तेव्हा ही मागणीही मंजूर झाली. त्याचा फायदा आज लाखो विद्यार्थी घेत आहेत. मराठवाड्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी आंदोलक आग्रही होती अशी महिती त्यांनी दिली.
21 फेब्रुवारी, 1974 ला वसंतराव नाईक यांनी राजीनामा दिला. तत्पूर्वी आंदोलनाची धग वाढत चालली होती. नाईक यांचे पद जाणार याचे संकेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी संभाजीनगर येथे झालेल्या जिल्हा बँकेच्या कार्यक्रमात दिले होते. या कार्यक्रमाला वसंतराव नाईक उपस्थित होते. हा कार्यक्रम आटोपून ते जळगावकडे जाणार होते. त्यासंबंधीची आठवण ज्येष्ठ पत्रकार बा. न. मग्गीरवार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केली आहे. ‘..नाईक जळगावकडे निघाल्यावर मी दुसर्या गाडीने त्यांच्या पाठोपाठ निघालो. नाईक सिल्लोडला विश्रामगृहावर थांबले होते. मी आलो असल्याची माहिती त्यांना दिल्यानंतर ते स्वत:हून बाहेर आले, मला एवढेच म्हणाले, सगळं संपलं आहे..’
या आंदोलनामुळे अंबाजोगाई येथे वैद्यकीय महाविद्यालय मिळाले. दुसर्या काही प्रश्नांची तड लागण्यास बराच विलंब झाला. पण एवढे मात्र खरे की, मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळाले. नाईक यांनी राजीनामा दिला, तेव्हा शंकरराव चव्हाण हे परदेशात होते. ते तातडीने परतले. 21 फेब्रुवारी, 1975 ते 17 मे, 1977 असा दोन वर्ष 85 दिवसांचा पहिला कालखंड महाराष्ट्राने अनुभवला.