Marathwada Vikas Andolan : वसमतच्या गोळीबारामुळे सुरू झाले मराठवाडा विकास आंदोलन

150 पदांसाठी साडे चार हजार युवकांची हजेरी, मुलाखतीबाबत अफवा पसरल्या आणि हिंसाचार झाला..
वसमतच्या गोळीबारामुळे सुरू झाले मराठवाडा विकास आंदोलन
वसमतच्या गोळीबारामुळे सुरू झाले मराठवाडा विकास आंदोलनFile Photo
Published on
Updated on

Marathwada development movement started due to Vasmat firing

उमेश काळे

छत्रपती संभाजीनगर : 1970 नंतर मराठवाडा विकासाच्या मागण्या पुढे येत राहिल्या. त्या सोडवणुकीसाठी फारसे प्रयत्न होत नसल्याची जनभावना बनली. त्यातच परभणी जिल्ह्यातील वसमत येथे कालवा निरीक्षक पदासाठी मुलाखती होत्या. एकूण जागा 150 आणि उमेदवार संख्या होती साडे चार हजार. त्यातच कोणीतरी अफवा पसरविली, की नियुक्त्या अगोदरच झाल्या आहेत, मुलाखती हा निव्वळ फार्स आहे. या अफवेचे रूपांतर युवकांच्या प्रक्षोभात झाले आणि जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. ही तारीख होती 27 मार्च, 1974..

वसमतच्या गोळीबारामुळे सुरू झाले मराठवाडा विकास आंदोलन
कर्णपुरा यात्रा : वेंकटरमणा गोविंदाच्या जयघोषात सीमोल्लंघन, श्री बालाजी रथावर रेवड्यांची उधळण

या गोळीबारात मरण पावलेले दोन युवक होते जिंतूर तालुक्यातील. देवीदास मेहरबान राठोड (रा. पिंपळगाव काजळ) आणि रामा देवीचंद शिसोदे (रा. जोगवाडा) ही त्यांची नावे. वसमतचाच दिगंबर देवराव हा युवक जखमी झाला. वसमतच्या एका घटनेमुळे मराठवाडा पेटून उठला. तेव्हा वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात असणारे गृह राज्यमंत्री शरद पवार म्हणाले, की काही युवकांनी पोलिसांकडून बंदुकी हिसकावून घेतल्या, त्यामुळे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर झाला.

वसमतमुळे आक्रमकता वाढली

गोळीबाराची बातमी कळताच मराठवाड्यातील अनेक नेते वसमतला धावले. बाळासाहेब पवार, ब. ल. तामसकर, गणेशराव दूधगावकर, विजय गव्हाणे, सुभाष लोमटे, कलमकिशोर कमद, व्दारकादास पाथ्रीकर, जीवनराव गोरे, चंद्रशेख राजूरकर अशी कितीतरी नावे पुढे येतील. गोपीनाथराव मुंडे हे तेव्हा लॉ शिकण्यासाठी पुण्यात होते. ते नंतर आंदोलनात सक्रिय झाले. गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाची आक्रमकता एवढी होती की पोलिसांनाअनेक ठिकाणी अश्रुधूर, लाठीमाराचा वापर करावा लागला. मराठवाडा विकासासाठी सुरू झालेल्या या आंदोलनात अनेकांनी सहभाग घेतला. सत्याग्रही म्हणून कार्यकर्त्यांच्या नोंदी होत. त्यामुळे सरकारही हैराण झाले. अखेर वसंतराव नाईक यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेला बोलाविले. मराठवाड्यासाठी हायकोर्ट, रेल्वे रूंदीकरण, रखडलेले सिंचन प्रकल्प मंजूर करणे, वैधानिक विकास मंडळ आदी मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या.

वसमतच्या गोळीबारामुळे सुरू झाले मराठवाडा विकास आंदोलन
Waluj Mahanagar : पत्नी पीडित पुरुषांनी केले शुर्पणखा प्रतिकृतीचे दहन

भालेराव यांचे अनुभव कथन

याबाबत एका यूट्यूबला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव आपला अनुभव सांगतांना म्हणाले, वसमतचा गोळीबार झाला, तेव्हा मी मुंबईत होतो. गोळीबाराची माहिती पेपरमध्ये वाचताच मी तडक छत्रपती संभाजीनगरकडे निघालो. मी संभाजीनगरात पोहचलो खरा, पण घरी जाता आले नाही. संचारबंदी होती, पोलिसांचे टार्गेट विद्यार्थी, युवक होते. पोलिसांनी माझी संशयावरून झडती घेतली. बॅगमध्ये वही, पेन असल्यामुळे मला पोलिसांनी हर्सूल जेलमध्ये टाकले. तेथे अनेक नेते भेटले. विजय गव्हाणे यांनी एकहा विषयाची मांडणी केली, ती अशी की मराठवाड्यात बेरोजगारी आहे,अनेक प्रश्‍न प्रलंबित पडलेत. महाराष्ट्रात ज्या हेतूने आपण सहभागी झालो, ते साध्य झाले नाही.

आंदोलन कालांतराने थंडावले

एका लेखात सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते अमर हबीब लिहितात, वसमत आंदोलनाच्या वेळी परभणीच्या कृषी महाविद्यालयात परीक्षा सुरु होत्या. ही वार्ता तेथे पोचताच विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार घातला व ते बाहेर पडले. त्यानंतर सार्‍या मराठवाड्यात विद्यार्थी असंतोषाचे वादळ घुमू लागले. याच काळात बिहार मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार झाला म्हणून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीचे आंदोलन सुरु झाले होते. पाठोपाठ गुजरात मधील विद्यार्थीही रस्त्यावर उतरले होते. ही तीनही आंदोलने तरुणांचा अपेक्षाभंग झाला म्हणून सुरु झाली होती.

ती व्यवस्थेला बदलू मागणारी होती. बिहारला जे.पी.चे नेतृत्व मिळाल्याने त्याचे जन आंदोलनात रुपांतर झाले. संपूर्ण क्रांती सारखा विचार पुढे आला. गावोगाव समित्या सक्रीय झाल्या. पुढे याच आंदोलनामुळे केंद्रातीय काँग्रेसची सत्ता गेली. मराठवाड्यात मात्र वेगळेच घडले.मराठवाडा विकास परिषदेला जनाधार नव्हता. विद्यार्थी आंदोलनाला नेतृत्व नव्हते. आंदोलन औरंगाबादला पोचले आणि विकास परिषदेचे नेते त्यावर स्वार झाले. व्यवस्थेचे मुलभूत प्रश्न बाजूला राहिले. मराठवाड्याच्या विकासाच्या मागण्या पुढे आल्या. कालांतराने हे आंदोलन विरून गेले. अर्थात या आंदोलनातून एक राजकीय लाभ झाला, तो म्हणजे मराठवाड्याचा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news