छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि लातूर या पाच महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यात शिवसेना, भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे यातील बहुतांश जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडखोरी करून अपक्ष उमदेवारी दाखल केली. आता या बंडोबांना थंड करण्याचे आव्हान या नेत्यांपढे निर्माण झाले असून, आज उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यंदा मुंबई वगळता सर्वच महापालिकांच्या निवडणुका या प्रभाग पद्धतीने होत आहेत. यात मराठवाड्यातील क आणि ड प्रवर्गात मोडणार्या पाचही महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकांच्या उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननीची प्रक्रिया पार पडली. यात शेकडो उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यानंतर आता उरलेल्या सर्व पात्र उमेदवारांतून अर्ज माघारीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
2 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे, परंतु मराठवाड्यातील पाचही महापालिकांमध्ये शिवसेना भाजपमध्ये युती झालेली नाही. तरीही दोन्ही पक्षाकडे इच्छुकांची संख्या भरमसाठ असल्याने अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
या उमेदवारी नाकारण्याच्या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयात प्रचंड उद्रेक घडला. दोन दिवसांत भाजपच्या प्रचार कार्यालयात राडा कायम राहिला. अशीच परिस्थिती शिंदेसेनेच्या कार्यालयात कायम होती. यातील अनेकांनी उमेदवारी नाकारल्याने अपक्ष अर्ज दाखल केला. या अपक्ष बंडखोरांना आता शमविण्याचे मोठे आव्हान सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांपुढे निर्माण झाले आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या पाचही शहरांतील नेत्यांना आपापल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. आज उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत शिवसेना, भाजपच्या नेत्यांना चांगलीच कसरात करावी लागणार आहे.
प्रमुख नेत्यांवर जबाबदारी
मराठवाड्यात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये झाली आहे. त्यामुळे पाचही महापालिकांतील या बंडबांना थंड करण्यासाठी भाजपने काही प्रमुख नेते, मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर जबाबदारी आहे.
बंडखोरी शमविण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात
भाजपमध्ये झालेली बंडखोरी शमविण्यासाठी आता मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी काही बंडखोरांशी संपर्क साधल्याचे कळते. याशिवाय पक्षातील बड्या नेत्यांवर बंड शमविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्थानिक बंडखोरी वेळीच रोखण्यासाठी स्थानिक नेते आता अनेक बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगत असल्याचे समजते. या नेत्यांनी त्यांना भाजपची पक्ष शिस्तसह संयमाची आठवण करुन दिल्याचे समजते. त्यांच्या कुटुंबियांशी ही बडी नेते संवाद साधत आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून अपक्ष उमेदवार संदीप जाधव यांची मनधरणी करण्यात आली. अमित साटम यांच्या मध्यास्थिमुळे अखेर उमेदवार संदीप जाधव उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे समजते.