Uddhav Thackeray  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

UBT Marathwada Development Protest: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आजसंभाजीनगरात शिवसेनेचा 'एल्गार'

विभागीय आयुक्तालयावर धरणे आंदोलन, मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासकामांवर सरकारला जाब विचारणार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्याचा विकास आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने 'मराठवाड्याचा विकास... तुमसे ना हो पायेगा!' हे जनआंदोलन पुकारले आहे. १ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या जनआंदोलनाच्या अंतिम टप्प्यात आज गुरुवारी (दि. १७) सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा कागदावर न राहता प्रत्यक्षात पूर्ण कराव्यात, रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत आणि विकासाचा अनुशेष भरून काढावा, या मागण्यांसाठी शिवसेनेने हे आंदोलन तीव्र केले आहे. याबाबत शिवसेना नेते आ. अंबादास दानवे यांनी बुधवारी (१६) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सप्टेंबर २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये विविध विकासकामे, प्रकल्प आणि सिंचन प्रकल्पांच्या घोषणा केल्या. मात्र, अनेक निर्णय अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे आ. दानवे म्हणाले.

यापूर्वी १ सप्टेंबरपासून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये व्यापक जनआंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये निवेदने देत जिल्हास्तरावर आंदोलने करण्यात आली असून, सातही जिल्हाधिकाऱ्यांसमवेत संबंधित जिल्ह्यांतील विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. आता या जनआंदोलन अंतर्गत गुरुवारी संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सकाळी साडेअकरा वाजता शिवसैनिकांसमवेत या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT