आपेगाव येथे असलेली संत ज्ञानेश्‍वरांची मूर्ती pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Paithan Sant Dnyaneshwar | मराठवाडा अन् आषाढी; पैठणमध्ये ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविले

जन्‍म आपेगावचा असल्‍याची नोंद, नेवाशात लिहिली ज्ञानेश्‍वरी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आषाढीच्या काळात वारकरी दोन संतांचा गजर करतात..संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम. यापैकी संत ज्ञानेश्‍वरांचा मराठवाड्याच्या मातीशी निकटचा संबंध आहे. पैठणपासून दहा किमी अंतरावर आपेगाव आहे. याठिकाणी संत ज्ञानेश्‍वरांचा जन्‍म झाला.

अर्थात ज्ञानेश्‍वरांसह चारही भावंडांचा जन्‍म आळंदीत झाल्‍याचा मतप्रवाह आहे. परंतु यासंदर्भात खंडपीठात आपेगाव संस्थानचे प्रमुख ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्‍यावर निर्णय देताना आपेगाव हीच संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची जन्मभूमी असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

अर्थात बालपणापासून त्‍यांना संन्‍याशाची मुले अशा टीकेला सामोरे जावे लागले. परिणामी त्‍यांचे वडिल व विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई आळंदीत आले. ( कुलकर्णी यांचे मूळ आपेगाव असून ते तीर्थयात्रा करीत आळंदीत दाखल झाल्‍याचाही उल्लेख आहे. ) तेथे त्‍यांची उपेक्षा संपली नाही.

पैठण येथे रेड्याच्या मुखी वेद वदविला, तेथे असणारी रेड्याची मूर्ती

मुलांवर संस्‍कार व्‍हावेत असा त्‍यांचा आग्रह होता. परंतु त्‍यांनी संन्‍याशी होऊन पुन्‍हा गृहस्‍थाश्रम स्‍वीकारल्‍याने तेव्‍हा त्‍यांना मृत्‍यूदंडाशिवाय दुसरा पर्याय नाही, असा निर्णय आळंदीतील ब्राम्‍हणवर्गाने दिल्‍यानंतर त्‍यांनी तो मान्‍य केला व देहत्‍याग केला. त्‍यामुळे मुंजीसाठी कोणाची परवानगी मागावी असा सवाल संत ज्ञानेश्‍वरांनी केल्‍यानंतर त्‍यांना पैठणच्या ब्रम्‍हवृंदाची मान्‍यतेचे पत्र आणा असे सांगण्यात आले. त्‍यानुसार चारही भावंडे पैठणला आली.

रेड्यामुखी वेद वदिला

पैठणच्या धर्म न्यायपीठाकडे मुंजीची परवानगी द्यावी, या विनंतीसाठी आल्‍यावर सभा बोलाविण्यात आली. ब्राम्‍हणांच्या प्रश्नांना ज्ञानेश्‍वर उत्तर देत होते. तरीपण या मंडळींचे समाधान झाले नाही. त्‍याचवेळी तेथून श्रीक्षेत्र आळंदीच्या धर्ममार्तंडांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्मसभेचे शुद्धीपत्र मागितले. त्यामुळे ही भावंडे पैठण येथे गेली.

पैठण येथील धर्मसभेमध्ये त्यांना अनेक सत्त्वपरीक्षांना सामोरे जावे लागले. त्या वेळी समोरून ‘वाकोबा’ नावाचा कोळी आपल्या ‘गेनोबा’ नावाच्या रेड्यास घेऊन जात असतांना धर्मसभेतील एका धर्मपंडिताने ज्ञानदेवांना विचारले, ‘‘त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे का ?’’ तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, ‘‘तोची माझा आत्मा ॥’’ ‘हे सिद्ध करून दाखव’, असे सांगितल्यावरून संत ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेऊन आपल्‍यामागे वेद उच्चारण्याची त्यास आज्ञा केली. त्या वेळी रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाचे पुढील ध्वनी बाहेर पडले, ‘ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होेतारं रत्नधातमम् ॥’ धर्माचार्यांसह उपस्थितांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जयजयकार केला.

ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपान, मुक्ताई ही भावंडे देव अवतार असल्याची प्रचिती उपस्थितांना आली. यावेळी रेड्याला काठीने मारले असता त्‍याच व्रण ज्ञानेश्‍वरांच्या पाठीवर उमटले. या चमत्काराने प्रभावित होऊन धर्मसभेने संत ज्ञानेश्वर यांना शुद्धीपत्र बहाल केले.तेव्हापासून तो रेडा हा संत ज्ञानेश्वर यांच्यासोबत राहिला.

नेवाशात ज्ञानेश्‍वरी

पत्र सोबत घेत सर्व भावंडे आळंदीकडे निघाली. परंतु ४५ किमी अंतरावर असलेल्‍या नेवाशात त्‍यांचा मुक्‍काम पडला आणि हा परिसर त्‍यांना आवडला. याठिकाणी असलेल्‍या एका मंदिरातील पैस खांबाला टेकून ज्ञानेश्‍वरांनी भावार्थदिपिका लिहिली, त्‍याचे रूपांतर पुढे ज्ञानेश्‍वरीत झाले. गुरू संत आणि मोठे बंधू संतनिवृत्तीनाथ यांच्या आदेशावरून त्‍यांनी हे लिखाण केली. खांबाला टेकून ज्ञानेश्‍वर गीतेमधील एकेका श्‍लोकाचे विवरण करीत आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेत असत.

रेड्याचा झाला मृत्‍यू

ज्ञानेश्‍वरीचे कार्य पूर्ण झाल्‍यावर संत ज्ञानेश्‍वर आळंदीकडे निघाले. त्‍यांच्यासोबत असणारा रेडा डोंगरदऱ्यांची अवघड वाट पादाक्रांत करताना थकला आणि त्याने रस्त्यातच प्राण सोडले. त्यामुळे त्याच ठिकाणी या चारही भावंडांनी रेड्याला मूठमाती दिली. ते ठिकाण म्हणजेच आजचे आळे.शके १२१२ म्हणजे इ.स. १२९० साली या रेड्याची समाधी बांधण्यात आली. त्यानंतर १७६४ साली स्थानिक रहिवासी आनंदराव भिकाजी शेटे यांनी या मंदिराचे बांधकाम केल्याची नोंद आहे. आनंदराव यांचे वंशज भालचंद्र शेटे यांनी समाधिस्थानाच्या वरच्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.

नेवास येथे पैस खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वराची रचना पूर्ण केली.

आपेगाव येथे असलेल्‍या संत ज्ञानेश्‍वर मंदिरात विविध उत्‍सव साजरे होतात. या मंदिरात सातत्याने धार्मिक कार्यक्रम होत असतात. ज्ञानेश्वरांचा जन्म गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर झालेला असल्याने त्या दिवशी येथे मोठा उत्सव केला जातो. पारायण, हरिपाठ आदी कार्यक्रम येथे वर्षभर सुरू असतात. २९ ऑगस्ट १९७५ रोजी शासनाच्या वतीने येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म सप्तशताब्दी सोहळा साजरा करण्यात आला होता. याशिवाय आपेगावच्या विकासासाठी राज्य शासनाने २०११ मध्ये पैठण–आपेगाव विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT