

पैठण : नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे. नाशिक परिसरातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून, पाणी वेगाने जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर जलाशयात दाखल होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत आहे.
आज सकाळी ६ वाजता धरणातील उपयुक्त पाणीसाठा ३२.०७ टक्के होता, तो दुपारी ३ वाजेपर्यंत ३४.७० टक्क्यांवर पोहोचला असून, अवघ्या नऊ तासांत २.६३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
उद्यापर्यंत पाणीसाठा ४० टक्क्यांपर्यंत
सध्याचा आवक वेग कायम राहिल्यास शनिवार (दि.२५) सकाळपर्यंत नाथसागरातील पाणीसाठा ४० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पुढील काही दिवस गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून विसर्ग सुरू राहिल्यास जायकवाडी धरणाची वाटचाल ५० टक्के पाणीसाठ्याकडे होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या नांदूर-मधमेश्वर येथून एकत्रित ९७,९८७ क्यूसेक वेगाने विसर्ग नाथसागराकडे होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा अवघ्या काही तासांत झपाट्याने वाढला आहे.