Maratha Reservation : सगेसोयरे, सरसकट मुद्दा सोडला नाही : जरांगे pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : सगेसोयरे, सरसकट मुद्दा सोडला नाही : जरांगे

संपूर्ण मराठा समाज ओबीसीत जाणारच : हैदराबाद गॅझेटच्या जी.आर. वर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचेही आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Maratha Reservation Manoj Jarange Chhatrapati Sambhaji Nagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आजवर ७५ वर्षांत मिळवता आला नाही, असा ऐतिहासिक विजय मराठा समाजाने मिळवला. आता महाराष्ट्रातील सर्व मराठे हळूहळू ओबीसीत जाणार म्हणजे जाणार, फक्त शांतता आणि संयम ठेवा, असे आवाहन करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अजूनही सगेसोयरे आणि सरसकट हा मुद्दा सोडला नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. हैद्राबाद गॅझेटच्या जी.आर.वर शंका उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी टोलाही लगावला आणि त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना काही काम नाही, असे स्पष्ट केले.

जरांगे यांना मंगळवारी (दि.२) मुंबईत सायंकाळी उपोषण सोडल्यानंतर उपचारासाठी शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात रात्री उशिरा भरती करण्यात आले. त्यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत जरांगे यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, बुधवारी (दि.३) दुपारी त्यांनी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, सरकारने आता हैद्राबाद गॅझेट लागू केले. एका महिन्यात सातारा संस्थानाचे गॅझेट लागू करणार, मराठा आणि कुणबी एकच असल्याची जी.आर. पण काढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मराठा ओबीसीत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या मराठा समाज बांधवांकडे कुणबीच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी गावपातळीवर तीन सदस्यीय समिती असेल.

जमीन नसलेल्यांना बटाईवर शेती केल्याचे हमीपत्र दिल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळेल. मी समाजाचे वाटोळे करणार नाही. माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. जी.आर. मध्ये एखादा शब्द कमी असेल तर सुधारित जी.आर. काढण्याचा शब्द मंत्रिमंडळाने दिला आहे, असे ते म्हणाले. तसेच आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वीकारली असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच त्यांनी आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत व नोकरी देण्याचेही आश्वासन दिले. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवा, अशा शब्दांत त्यांनी मराठा समाजाला दिलासाही दिला. तसेच जीआरच्या अभ्यासासाठी सर्व अभ्यासकांना उद्या भेटण्यासाठी बोलवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे आभारही व्यक्त केले. दरम्यान जरांगे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना पुढील काही दिवस आरामाची गरज असल्याचे डॉ. विनोद चावरे यांनी सांगितले.

भुजबळांना अडचण म्हणजे जीआर पक्का !

मंत्री छगन भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीतून उठले, अशी माहिती आहे. त्यांना अडचण झाली म्हणजे हा जी.आर. पक्का आहे. तसेच जीआरवर काही किडे-मकोडे अफवा पसरवत आहेत. समाजाने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यावर बोलताना ते म्हणाले, कोण विनोद पाटील मी ओळखत नाही. इतक्या दिवस कुठे होते. तसेच जीआर जे विरोध करत आहेत, त्यांनी आतापर्यंत काहीच केले नाही. खूप ऐकले त्यांचे. त्यामुळे जो जास्त विरोध करेल त्यांना उत्तर द्या, असेही ते म्हणाले.

हा जीआर नव्हे, माहिती पुस्तिका

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा काढलेला अध्यादेश याला मी जीआर मानायला तयार नाही. ते माहिती पत्रक किंवा पुस्तिका असल्याचे स्पष्ट मत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केले. यातून मराठा समाजाच्या हाती काहीच लागणार नाही. या जीआरचा टाचणी एवढाही फायदा होणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे.

दरम्यान याबाबत बोलतांना विखे पाटील म्हणाले, यावेळी मुंबई आंदोलन सुरू होते त्यावेळी हेच विनोद पाटील मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये बसून होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT