Chhatrapati Sambhaji Nagar Dry fruit Theft: काजू-बदाम चोर! अवघ्या 25 मिनिटात दुकान 'साफ', तब्बल 380 किलोंचे ड्रायफ्रूट चोरले
Dry fruit shop robbery news
छत्रपती संभाजीनगर : दुकानाचे शटर उचकटून चोरांच्या टोळीने तब्बल ३८० किलो ड्रायफ्रूटसह रोख रक्कम असा ४ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (दि.३१) मध्यरात्री देवळाई रोडवरील कौसर पार्कजवळ घडली. दरम्यान कारमधून आलेल्या या चोरट्यांनी अवघ्या २५ मिनिटात दुकानात चोरी करून पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
फिर्यादी मोहम्मद जाकीर ठेकिया (४१, रा. हुसेन कॉलनी) यांचे रॉयल सुपर मार्केट नावाने देवळाई रोडवर किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते रविवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री चोराने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
दुकानातून ५० किलो बदाम, ७५ किलो काजू, ५० किलो अंजीर, ५० किलो पिस्ता, २० किलो मखाना, १०० किलो मनुका, १० किलो अक्रोड, २५ किलो खजूर आणि १५ हजार रोख असा ऐवज लंपास केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

