Sambhajinagar News : हाकेंच्या विधानावर मराठा समाज आक्रमक  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : हाकेंच्या विधानावर मराठा समाज आक्रमक

क्रांती चौकात बॅनरला मारले जोडे; निषेध नोंदवत जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Maratha community aggressive over Haake's statement

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आंतरजातीय विवाहाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. या संतापाचे पडसाद रविवारी (दि.१४) छत्रपती संभाजीनगरात उमटले. सकाळी क्रांती चौकात मराठा समाजाने घोषणाबाजी करत हाके यांच्या बॅनरला जोडे मारून निषेध नोंदविला.

यानंतर आंदोलकांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेत हाके यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन दिले. लक्ष्मण हाके छत्रपती संभाजीनगरात आले तर जोड्याने स्वागत करू, असा इशारा देत आंदोलकांनी जिल्ह्यात प्रवेशबंदीचा इशाराही दिला. यावेळी आंदोलकांनी लक्ष्मण हाकेचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, लक्ष्मण हाके मुर्दाबाद अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून सोडला होता.

दरम्यान, पोलिस बंदोबस्तात झालेल्या या आंदोलनादरम्यान समाजाच्या भावना भडकावणारे वक्तव्य करणारे हाके यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणीही प्रशासनाकडे केली. ओबीसी नेते हाके यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मराठा आरक्षणाविरोधात आंदोलने सुरू आहेत. याच आंदोलनादरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. यावेळी आंदोलनात सुनील कोटकर, सुरेश वाकडे, राजीव थिटे, नीलेश ढवळे, योगेश शेळके धामोरीकर, नितीन कदम, निवृत्ती डक, रवींद्र काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, अरुण नवले, बाळासाहेब भगरे, सचिन मिसाळ, अॅड. सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले, सचिन भांबट, केशव तारे, ज्ञानेश्वर तांबे, उद्धव साळुंके, नंदू गरड, गोपाळ चव्हाण, निखिल खरात, सौरभ राऊत, सुरेश लांडगे, पवन पाटील, प्रदीप पाटील, उत्तम लोहखरे आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

हाकेंच्या आव्हानानंतर रमेश पाटील बनले नवरदेव

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंतरजातीय विवाहासंदर्भात मराठा समाजाला दिलेल्या आव्हानानंतर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मराठा समाजातील रमेश पाटील यांनी रविवारी सकाळी हार व मुंडावळ्या घालून प्रत्यक्षात नवरदेव बनून रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर दिले. गुलमंडी परिसरातील घरून पाटील कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींसह वरात निघाली. यावेळी गल्लीतील मुलांनी ढोल-ताशांच्या तालावर डान्स करत पुढे मार्गक्रमण केले, पाटील यांनी हाके यांच्या आव्हानाला प्रतिसाद देताना, आधी तुमच्या घरातील मुलगी मला द्या, मगच समाजाकडून मागा, असा पलटवार केला. तसेच हाके यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारतो, असेही स्पष्ट केले.

हाकेंवर गुन्हा दाखल करा : मराठा मावळा संघटनेची मागणी

हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मराठा मावळा संघटनेने मराठा समाजातील महिलांविषयी अशब्द वापरल्याचा आरोप केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको पोलिस ठाण्यात रविवारी (दि. १४) निवेदनाद्वारे हाके यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा गणिमी काव्याच्या पद्धतीने धडा शिकवला जाईल, असा इशारा दिला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे, राज्य संघटक भरत कदम, कोषाध्यक्ष गोपीनाथ निकम, शहरप्रमुख संजय गायके, रामदास हाडगे, सोमनाथ जीवरग, विजय निकम, अनिल तायडे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता पाटील, जिल्हा संघटक शोभा जाधव, कार्याध्यक्ष पूजा तुपे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT