

Crops damaged due to Lohegaon seepage pond bursting, farmers angry due to administration's negligence
लोहगाव, पुढारी वृत्तसेवा : लोहगाव (ता. पैठण) येथील गट क्र. १०५ मध्ये असलेला पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकर क्षेत्रातील पिके वाहून गेली. रविवारी (दि.१४) सकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत गावातील तसेच शेजारील घरात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. बाजारपेठेत असलेली दुकाने, डांगे वस्तीत तसेच ओढ्यालगतच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शनिवारी संध्याकाळी तब्बल १६९ मिमी पावसाची नोंद झाल्याने तलाव ओसंडून वाहू लागला. मान सूनपूर्व आऊटलेट खोल न केल्याने तसेच तलाव क्षमतेपेक्षा जास्त साठा झाल्याने मध्यभागी भगदाड पडून पाणी गावाकडे वळले. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस, मका व भाजीपाल्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ज्योती पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तलाठी मारोती दंडे, कृषी सहायक अमोल तेजीणकर, जलसंधारण अधिकारी संदीप राठोड हे उपस्थित होते. त्यांनी आकाश गढीये व गणेश कव्हाळ यांना पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
२०२० साली तत्कालीन तहसीलदार यांना निवेदन देऊन पाझर तलावाचे मूल्यांकन करून त्याची उंची वाढवावी, तसेच सांडवा तयार करावा, अशी ग्रामस्थ त्र्यंबक बोरुडे यांनी मागणी केली होती. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आजची दुर्घटना घडली. गावात अजूनही पाणी उपसा, निचरा व साफसफाईचे काम व्यवस्थित न झाल्याने शेतकऱ्याच्या गावालगत असलेल्या शेतात हे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठ्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे.