Manoj Jarange Patil  
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil : "कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायची असेल तर अंतरवलीत येऊ नका"; जरांगे पाटलांचा थेट इशारा

चंद्रशेखर बावनकुळे अन् संजय शिरसाटांवर मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा घाट

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange Patil : "ज्यांना कोणाला राजकीय पक्षाची बाजू घ्यायची असेल, त्यांनी अंतरवली सराटीत येऊच नका. इथे येऊन ज्ञानही पाजळू नका," अशा शब्दांत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. यावेळी त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा घाट घातल्याच्‍या आरोपाचा पुन्‍नरुच्‍चार केला. दरम्‍यान, आज दुपारी अंतरवली चराटीमध्‍ये आज मराठा आरक्षण अभ्‍यासकांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सरकारकडून मराठा समाजाचा अवमान

माध्‍यमांशी बोलताना समर्थकांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "सरकारने जाणूनबुजून मराठा समाजाचा अवमान चालवला आहे. विशेषतः बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा घाट घातला असून समाजावर अन्याय करण्याचं ठरवलं आहे. पण हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. समाजासाठी जी किंमत मोजावी लागेल ती मोजू, पण मागे हटणार नाही." २८ तारखेपर्यंत सरकारला वेळ देण्यात आला असून, त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुटप्पी भूमिका आता चालणार नाही

आंदोलनातील समन्वयक आणि अभ्यासकांच्या भूमिकेवर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले, "अभ्यासकांनी आणि समन्वयकांनी पक्षाची बाजू सोडून जरा स्वतःच्या जातीची बाजू घेतली तर बरं होईल. अभ्यास सांगायचा मराठा समाजाला आणि बाजू घ्यायची सरकारची, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही. राज्यातल्या गरिबांना समन्वयकांची गरज आहे, पण दोन-दोन ठिकाणी काम करून चालणार नाही. सर्वांना एकच बाप मानावा लागेल आणि तो म्हणजे 'मराठा समाज'."

मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजेत

SEBC आणि EWS प्रवर्गातून निवड होऊनही नियुक्त्या न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी चिंता व्यक्त केली. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे पण नियुक्तीपत्र मिळालेले नाही, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपले अर्ज घेऊन अंतरवली सराटी येथे त्वरित यावे, असे आवाहन त्यांनी केले. "५८ लाख नोंदी सापडूनही कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सर्व मागण्या मार्गी लागल्या पाहिजेत," असे त्यांनी ठणकावून सांगितले.

कुणबी प्रमाणपत्र व व्हॅलिडिटीसाठी अर्ज अंतरवलीत द्यावा

मराठा बांधवांना नोंद सापडूनही कुणबी प्रमाणपत्रे किंवा व्हॅलिडिटी (जात वैधता प्रमाणपत्र) मिळालेली नाही, त्यांनी संबंधित अधिकारी आणि तालुक्याच्या माहितीसह एक अर्ज स्थानिक प्रशासनाला देऊन दुसरा अर्ज अंतरवली सराटी येथे आणून द्यावा, असे सांगण्यात आले आहे. "प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळेपर्यंत आता मराठा तरुण गप्प बसणार नाहीत," असा इशारा देत जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना एकजूट राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT