Man who brutally beheaded friend gets jailed
छत्रपती संभाजीनगर / कन्नड, पुढारी वृत्तसेवा : कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौताळ्याच्या जंगलात शीर धडावेगळे केलेला मृतदेह ३ सप्टेंबरला आढळून आला होता. २६ ऑगस्टला हत्या झाल्याने मृतदेह कुजून चेहऱ्याची त्वचा नाहीशी होऊन केवळ कवटी उरली होती. मात्र ग्रामीण पोलिसांनी मृताच्या जबड्यातील क्लिप वरून ओळख पटविली. त्यानंतर दहा दिवस कसून तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपी श्रावण ज्ञानेश्वर धनगर शिंदी, ता. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव असून, त्याने मृत निखिल हिरामण सूर्यवंशी ऊर्फ लगड ऊर्फ पाटील ऊर्फ सुरसे (२८, रा. शिदी, ता. चाळीसगाव) याचे श्रवण धनगर कुन्हाडीने मुंडके छाटल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी शुक्रवारी (दि.१२) दिली.
अधिक माहितीनुसार, कन्नड ग्रामीण हद्दीतील सायगव्हाण शिवारातील सनसेट पॉइंटजवळ जंगलात तरुणाचा मुंडके अलग केलेला मृतदेह ३ सप्टेंबर रोजी आढळला. अंगावर अंडरवेअर, हातात घडी, व्हीआर लिहिलेली जबड्यात क्लिप एवढाच पुरावा होता. पोलिसांनी व्हीआर कंपनीच्या क्लिप बसविणाऱ्या डॉक्टरचा शोध सुरू केला. धुळे, नाशिकचे अनेक हॉस्पिटल्स पालथे घातल्यानंतर इगतपुरी येथील एसएमबीटी रुग्णालय गाठले. तिथे क्लिप बसविणारा मृत निखिल सूर्यवंशी असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा २०२३ मध्ये अपघात झाल्याने जबड्यात क्लिप टाकली होती. पथकाने शिंदीत जाऊन त्याच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांची चौकशी केली. त्यात त्याचा जीवलग मित्र श्रावणचे नाव समोर आले.
आज तुझा शेवटचा दिवस आहे, असे म्हणत त्याने सोबत आणलेली कुन्हाड श्रावणवर चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रावणने बचाव करत त्याच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यात निखिल खाली पडला आणि हातातील कुन्हाड सुटली. तेव्हा श्रावणने ती कुन्हाड हिसकावून निखिलच्या मानेवर वार करत त्याचे शिर धडापासून वेगळे केले, अशी कबुली दिली. त्याला कन्नड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अत्र-पूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु. शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राज-पूत, सपोनि संतोष मिसळे, पवन इंगळे, जमादार प्रमोद पाटील, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, प्रशांत नांदवे, महेश बिरुटे, समाधान दुबीले, दीपक सुरोसे, बलवीरसिंग बहुरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे, नीलेश कुडे, कविता पवार यांनी केली.
२६ ऑगस्ट रोजी मृत निखिलने आरोपी श्रावणला भेटून माझ्या मैत्रिणीस छत्रपती संभाजीनगर येथे भेटायला जायचे आहे, तू माझ्यासोबत चल, असे सांगितले, त्यानुसार निखिल व श्रावण दुचाकीने सायगावमार्गे सनसेट पॉइंटजवळ पोहोचले. तेव्हा निखिलने श्रावणला उद्देशून सांगितले, ङ्गङ्खमी चोरी करतो, गुंडगिरी करतो, दारू पितो, माझी सर्व लफडी तुला माहीत आहेत. तुझ्यामुळे माझी गावात बदनामी होते. तू जर मेलास तर माझ्या अडचणी संपतील आणि माझे लग्ग्रहो होईल.
निखिल रोजंदारीवर धुमसचे काम करायचा. तसेच बकऱ्या चोरणे, गावात गुंडगिरीही करत होता. याबाबत त्याचा मित्र श्रावण धनगरला सर्व माहिती होती. तो कायम त्याच्यासोबत राहत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेताच तो भावनिक होऊन तुम्हाला सर्व सांगतो म्हणत ढसाढसा रडू लागला आणि सर्व हकीगत उघड केली.