Make the Ganesh immersion route pothole-free before the procession: Commissioner
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी शहरातील प्रमुख मार्गाची डागडुजी पूर्ण करून रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश गुरुवारी (दि.१०) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले. यासह पाणीपुरवठा आणि अन्य पाइपलाइनसाठी खोदलेले रस्ते संबंधित विभाग व ठेकेदारांकडून तातडीने पूर्ववत करून घ्यावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. विसर्जन मार्गावरील प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, बॅरिकेडिंग आणि वाहतूक नियोजनही वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि आगामी गणेशोत्सवाच्या तयारीचा संयुक्त आढावा गुरुवारी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी घेतला. यावेळी १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचीही त्यांनी माहिती घेतली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विसर्जन विहिरी, कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्ग, रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थेची स्थिती तपासण्यात आली.
तसेच विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. रात्रीच्या वेळी अडचण येऊ नये यासाठी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विसर्जन प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्याचे नियोजन असून, आवश्यकता भासल्यास कन्व्हेयर बेल्टच्या माध्यमातून विसर्जनाची व्यवस्था करण्याची तयारी ठेवण्यासही सांगण्यात आले. विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांनी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी, यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, पडेगाव-मिटमिटा, कला हाऊसिंग सोसायटी, विद्युत कॉलनी आणि राजीव गांधी मैदान येथे कृत्रिम तलाव उभारण्याचे नियोजन आहे. तर भावसिंगपुरा आणि जिल्हा परिषद मैदानातील विसर्जन विहिरींची स्वच्छता, गाळ काढणे यासह आवश्यक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अमोल कुलकर्णी, उपायुक्त विकास नवाळे, नंदकिशोर भोंबे यांच्यासह कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित होते.
प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा
महापालिकेकडून संस्थान गणपती ते जिल्हा परिषद मैदान या प्रमुख विसर्जन मार्गासह पंचवटी चौक, रेल्वे स्टेशन चौक, क्रांती चौकमार्गे संभाजी पेठ या मार्गावर पॅचवर्कची कामे सुरू करण्यात आली असून गणेशभक्तांना विसर्जनासाठी सुरक्षित आणि अडथळेविरहित मार्ग मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही आयुक्त येडगे यांनी बजावले.