Maize crops across hundreds of hectares in Kehali at risk due to chemical fertilizers
केऱ्हाळा, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात लाखो रुपयांचा खर्च करून मोठ्या अपेक्षेने मका पिकाची पेरणी केलेल्या केहऱ्हाळा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. रासायनिक खताचा वापर केल्यानंतर मका पिके पिवळी पडणे, वाढ खुंटणे आणि रोपे सुकू लागल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील मका पीक धोक्यात आले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गुरुवारी तालुका कृषी अधिकारी डॉ. संदीप जगताप, गुणनियंत्रण अधिकारी कुडके, उपकृषी अधिकारी पी. ए. पाटील, कृषी सहायक सारिका पाटील व वृषाली मुळे यांनी बाधित शेतांची पाहणी केली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी, "पीक गेले... कर्ज कसे फेडायचे ? आता आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे," अशा शब्दांत आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
पाहणीनंतर तालुका कृषी अधिकारी डॉ. संदीप जगताप यांनी संबंधित खताचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती दिली. तसेच कृषी शास्त्रज्ञांकडूनही लवकरच पिकांची पाहणी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. दरम्यान, खताचे नमुने तातडीने तपासून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा व बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी , ज्ञानेश्वर यादवराव पांढरे, क्रिष्णा रावसाहेब पांढरे, शेख मुंशी मगबुल शेख, उस्मानखा घिसेखा, भीमराव भागाजी पांढरे, देविदास तुकाराम पांढरे, जाकेर शेख ताहेर, नईम सय्यद, नामदेव अमृता देहाडे, अंकुश भिक्का पवार, विठ्ठल भीमराव पांढरे, सुभाष भीमराव पांढरे, राजेंद्र निरंजन गिरी, योगेश त्र्यंबक दारुंटे, संजय बंडू बांबर्डे, नंदू काटेकर, सोमनाथ पांढरे यांच्यासह अन्य बाधित शेतकऱ्यांनी केली.