गावातील वाद मिटवणाऱ्या तंटामुक्त समिती निष्क्रिय pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Tanta Mukta Gaon Committee : गावातील वाद मिटवणाऱ्या तंटामुक्त समिती निष्क्रिय

गंगापूर तालुक्यात समितींचे काम ठप्प; पाच वर्षांत पुनर्गठन नाही

पुढारी वृत्तसेवा

रमाकांत बन्सोड

गंगापूर : गावामधील किरकोळ वाद स्थानिक पातळीवरच सोडवून शांतता व सलोखा टिकवण्यासाठी शासनाने सुरू केलेले महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान आज केवळ नावापुरते उरले आहे. गंगापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तंटामुक्त समिती मागील पाच वर्षांपासून पूर्णपणे निष्क्रिय झाल्या असून, त्यांच्या कार्याचा गाडाच रुळावरून घसरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. कोरोनानंतर समितींचे पुनर्गठन न झाल्याने मतंटामुक्तफ ही संकल्पना प्रत्यक्षात कोलमडली असल्याचे मान्य करावे लागते.

गावात भेदभाव, मनमुटाव, लहान मोठे तंटे टाळण्यासाठी आणि वाद गावातच शांततेत मिटवण्यासाठी ही समिती कार्यरत केली होती. हा ढाचा पूर्वी प्रभावीपणे चालत होता. पाण्याची वाटणी, शेतीचे वाद, हद्द-वाटणीचे प्रश्न, कौटुंबिक भांडणे, रस्त्यांच्या अडचणी अशा अनेक तंट्यांचे निराकरण या समित्यांमुळे सोपे होत असे. परंतु आज त्यांचे अस्तित्व कागदापुरते मर्यादित राहिले आहे.

सन 2020 नंतर गावांमधील तंटामुक्त समितींचे पुनर्गठन झाले नाही. सदस्यांचा कार्यकाळ संपूनही नवीन सदस्यांची निवड करण्यात आली नाही. अनेक गावांमध्ये तर समितीच्या बैठका झाल्याच नाहीत. सरपंच, ग््राामसेवक व स्थानिक नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे समितींचे काम हळूहळू ठप्प झाले. ग््राामपंचायतीने समितीला आवश्यक असलेले प्रशासकीय सहकार्यही मिळाले नाही. काही गावांमध्ये गटबाजी, राजकीय भेद आणि वैयक्तिक वैमनस्यामुळे समितींना एकत्र बसणे अशक्य झाले.

परिणामी तंटामुक्त समिती निष्क्रिय बनल्या.पूर्वी पाणी, रस्त्यांची अडचण, सीमावाद, शेतातील वाटणी, घरगुती भांडणे यासारखे किरकोळ तंटे गावातच मिटत, पण आता परिस्थिती उलटली आहे. अनेक वाद पोलिस ठाण्यांपर्यंत जात आहेत. हास्यास्पद कारणांवरूनही तक्रारी नोंदवल्या जात आहेत. तसेच राजकीय वर्चस्वातून होणाऱ्या भांडणांना निवडणुकीचाही रंग चढतो.

समिती सक्रिय असत्या तर हे तंटे वाढण्यापूर्वीच मिटले असते, असा ग््राामस्थांचा आरोप आहे. स्थानिक नागरिक, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक निवृत्त सदस्यांनी समिती पुन्हा सक्रिय करण्याची मागणी केली आहे.

शांतता राखण्यासाठी तंटामुक्त समिती हा गावचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. वाद कोर्टात न नेता गावातच मिटवू ही भावना पुन्हा रुजवण्यासाठी शासनाने त्वरित पुढाकार घेण्याची गरज आहे.
लक्ष्मण भुसारे, चेअरमन
गावांमध्ये वाढत्या वादांच्या पार्श्वभूमीवर समिती पुन्हा कार्यान्वित केल्यास शांतता, सलोखा आणि ग््राामविकासाचा मार्ग सुकर होईल.
सुभान महमंद शेख, शिंगी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT