

नितीन थोरात
वैजापूर : नांदूर मधमेश्वर प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या अकरा कोटी रुपयांच्या लायनिंग (काँक्रीट) कामातील निकृष्ट दर्जाचा जिवंत पुरावा पुढारीने रियालिटी चेक करून समोर आणला असून, आठच दिवसांत या सिमेंट काँक्रीटच्या कामाला तडे जात असल्याचे उघड झाले आहे. काँक्रीट इतक्या हलक्या दर्जाचे असल्याचे आढळून आले की, कोणतेही यंत्र न वापरता ते सहज निघत असल्याचे चित्र समोर आले.
अकरा कोटींच्या निधीतून झालेल्या कामाची ही अवस्था असल्याने, दर्जा, मोजमाप व देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी यापूर्वीही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र संबंधित विभागाकडून केवळ चौकशीचे आश्वासन देत वेळकाढूपणा करण्यात आला. आता मात्र प्रत्यक्ष पुरावे समोर आल्याने, अधिकारी-कंत्राटदार संगनमताचा संशय अधिक गडद झाला आहे.
नांदूर मधमेश्वर अंतर्गत गंगापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर शाखा कालवा क्र.2 वरील सा.क्र. 0 ते 15000 मी. मधील व 15000 ते 16400 मी. मधील शाखा कालव्याचे व त्यावरील वितरिकेचे तसेच शाखा कालवा क्र.1 वरील वितरिका क्र.5 चे निवडक अस्तरीकरण व शाखा कालव्याचे सिंचन व्यवस्थापनातील त्रुटीची दुरुस्तीचा कार्यारंभ आदेश मे महिन्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांच्याकडून काढण्यात आला होता.
हे काम के.के. कंट्रक्शन या कंपनीला देण्यात आले असून, सध्याचे कार्यकारी अभियंता संत यांच्या निगराणीखाली हे काम सुरू आहे.मात्र या सगळ्या कामासंदर्भात शेतकऱ्याकडून तक्रार केल्यानंतर दैनिक पुढारीनेही या कामाचा रियालिटी चेक केला आहे. त्यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून, अकरा कोटींच्या सार्वजनिक निधीतून झालेल्या कामाची ही अवस्था पाहता दर्जा, मोजमाप आणि देखरेख यांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदूर मधमेश्वर विभागांतर्गत कालव्याच्या अस्तरीकरणाची कामे चालू आहेत. त्यातील एका चालू असलेल्या कामाच्या गुणवतेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, सदर तक्रारीबाबत कामाचा वस्तुनिष्ठ अहवाल विभागाकडून मागवण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे अधिकारी राजू देशमुख यांनी सांगितले.
कार्यकारी अभियंता संत यांचे मौन
निकृष्ट दर्जाचे काम जिथे सुरू आहे, तो सगळा भाग कार्यकारी अभियंता संत यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असून, या सगळ्या प्रकाराविषयी त्यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले. वेळोवेळी संपर्क करूनही त्यांनी थेट प्रतिसाद न दिल्याने, संशयाची सुई अधिकच बळकट होते.
लाभधारक शेतकऱ्यांत संताप
अकरा कोटींच्या कामात जर काँक्रीट हातानेच निघत असेल, तर हे काम शेतकऱ्यांच्या भवितव्याशी केलेली थट्टा आहे. कालवा मजबूत नसेल तर पाणी टिकणार कसे? निकृष्ट कामामुळे आमचे पीक, वेळ आणि पैसा वाया जाणार आहे. आता केवळ चौकशी न करता दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर तातडीने कठोर कारवाई करून काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करावे, अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली.
या सगळ्या प्रकरणाची तक्रार माझ्याकडे आली आहे. यासाठी चौकशी अधिकारी नेमण्यात येत आहे.
सुनंदा जगताप, मुख्य अभियंता कडा.