SSC Result 2025
वाळूज महानगर : अत्यंत हलाखीच्या परिस्थतीवर मात करत रांजणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दीपाली दिगंबर तुरटवाड या विद्यार्थिनीने इयत्ता दहावी परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला.भविष्यात दीपालीला डॉक्टर होण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
मूळचे नांदेड जिल्ह्यातील घुंगराळा येथील दीपालीचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी पाच वर्षांपूर्वी कुटुंबासह वाळूज एमआयडीसीमध्ये आले आहेत. दिगंबर तुरटवाड यांना तीन मुली व एक मुलगा असून, त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. रांजणगावात बारा बाय बाराची एक छोटी रूम भाडेतत्त्वावर घेऊन दीपालीचे वडील दिगंबर, आई राजमणी, बहीण रूपाली, लहान भाऊ कृष्णा असे चौघे जण राहतात. दीपालीचे आई-वडील कंपनीत ठेकेदारामार्फत काम करत असून, दोघांच्या पैशातून किमान कुटुंबाची दोन वेळच्या जेवणाची तसेच घरभाड्याची सोय होते. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा अपुरा पडत असल्याने त्यांनी मुलगी दीपाली व मुलगा कृष्णा यांना रांजणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत टाकले आहे.
आपल्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याची जाण दीपालीला होती. यामुळे शाळेतून घरी आल्यावर बहिणीला घरातील कामात मदत करून ती नियमित चार तास अभ्यास करायची. मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात दीपालीने आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करत ९५.२० टक्के गुण घेत तिने शाळेतून पहिला येण्याचा मान पटकाविला. कोणतेही महागडे क्लास तिने लावले नाहीत. नियमित अभ्यास व जिद्द, चिकाटीच्या जोरावर हे यश संपादित केल्याचे दीपालीने सांगितले. दीपालीला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.