Unseasonal Rain Compensation pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Unseasonal Rain Compensation : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १४ कोटी ९८ लाखांची मदत

'डीबीटी'द्वारे खात्यात जमा होणार निधी; विभागातील २,३७७ शेतकऱ्यांना २ कोटी ९६ लाख

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अमरावती या तीन विभागातील बाधित शेतकऱ्यांना १४ कोटी ९८ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यातील २३७७ शेतकऱ्यांसाठी २ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

राज्याच्या महसूल आणि वन विभागाने या मदतीचे आदेश जारी केले आहेत. एप्रिल महिन्यात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून राज्य सरकारकडे मदतीचे प्रस्ताव सादर केले होते. राज्यातील पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयांकडून हे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर केली आहे.

तिन्ही विभागांतील १६ हजार २६७ शेतकऱ्यांसाठी एकूण चौदा कोटी अठ्ठावण्ण लाख २० हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे.

पुणे विभागातील सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी ७ कोटी ९२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड धाराशीव आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी २ कोटी ९६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशी जिल्ह्यांसाठी ३ कोटी ६९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

संभाजीनगर विभागातील जिल्हानिहाय आकडेवारी

छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण २ हजार ३७७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. यात धाराशीव जिल्ह्यातील २,२०४ शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक २ कोटी ८४ लाख रुपये, नांदेड जिल्ह्यातील १४४ शेतकऱ्यांसाठी ९ लाख ५९ हजार रुपये, तर हिंगोली जिल्ह्यातील २९ शेतकऱ्यांसाठी २ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

विभागनिहाय मंजूर झालेला निधी

७ कोटी ९२ लाख- पुणे विभाग (सातारा, सोलापूर, पुणे)

३ कोटी ६९ लाख -अमरावती विभाग (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम)

२ कोटी ९६ लाख - छत्रपती संभाजीनगर विभाग (नांदेड, धाराशीव, हिंगोली)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT