Maharashtra Education syllabus
छत्रपती संभाजीनगरः एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. आता येत्या काळात राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकांमधूनही आपला इतिहास आणि आपल्याच महापुरुषांचे कार्य यावर अधिक प्रकाश टाकला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी शहरातील सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण संस्था आणि शासकीय विद्या निकेतनला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एनसीईआरटीने इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळला असून त्यात महाकुंभ, मेक इन इंडिया, बेटी बचाओ आदींचा समावेश केला आहे.
याबाबत विचारणा केली असता दादा भुसे म्हणाले, राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांतही यापुढे आपलाच इतिहास आणि आपल्याच महापुरुषांच्या कार्यावर अधिक प्रकाश टाकला जाईल. आपले जे दैवत होऊन गेलेले आहेत, त्यांची जास्तीत जास्त माहिती, त्यांचा इतिहास यापुढे अधिक प्रमाणावर समाविष्ट केला जाईल. यासोबतच आपला भुगोल, ज्यात तालुका पातळीवरचा, जिल्हापातळीवरचा भुगोल यालाही जास्त प्राधान्य दिले जाईल, इतिहासातून कुणाला काढण्यापेक्षा आता आपला जो इतिहास आहे, भुगोल आहे, तो आपल्या विद्यार्थ्यांना जास्त शिकविला पाहिजे, असे आमचे मत आहे, असेही भुसे यांनी सांगितले.
राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु तो निर्णय स्थगित करण्यात आला आहे. आताच्या घडीला हिंदी हा विषय ऐच्छिक केला आहे, त्याबाबत सुधारित शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असेही दादा भुसे यांनी सांगितले.
मोफत गणवेश योजनेअंतर्गत राज्यात यंदा वेळेवर गणवेश पुरविले जाणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात अगदी पहिल्याच दिवशी विद्यार्थी गणवेशात दिसतील. हे गणवेश चांगल्या दर्जाचे असावेत, केवळ पॉलीस्टर कपडा वापरु नये, जो कपडा वापरला जाईल त्यात सुतीचे प्रमाण किमान पन्नास ते साठ टक्के असावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नागपूर विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जिथे असे प्रकार समोर आल्यास तिथे भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, गरज भासल्यास चौकशीही करण्यात येईल, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.