यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गणवेश!

विद्यार्थ्यांना वाट पाहण्याची आवश्यकता नाही
Pune School News
यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गणवेश!File Photo
Published on
Updated on

गणेश खळदकर

पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, जिल्हा परिषद यांसह अन्य पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेशांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याची तब्बल 248 कोटींहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच शाळेत विद्यार्थी नव्या गणवेशात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरवर्षी विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर गणवेश मिळण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागते. त्या वेळीदेखील एकच गणवेश विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये दुसरा गणवेश दिला जातो.

यंदा पहिल्यांदाच यात बदल होणार आहे. त्यासाठी समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पावले उचलली असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गणवेशाचे वाटप करण्याचे निर्देश परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत.

यादव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, केंद्र सरकारकडून नुकतीच समग्र शिक्षाअंतर्गत मोफत गणवेश योजना अंदाजपत्रकाला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. यूडायस प्लसमधील समग्र शिक्षा, पीएमश्री व राज्य गणवेश योजनेसाठी पात्र लाभार्थी संख्या 42 लाख 97 हजार 790 इतकी असून, संबंधित लाभार्थ्यांना प्रतिलाभार्थी दोन गणवेश संचासाठी सहाशे रुपये या दराने 181 कोटी 47 लाख 97 हजार 200 रुपये या निधीसाठी भारत सरकारकडून तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे.

राज्य शासनाच्या गणवेश योजनेंतर्गत दारिर्द्यरेषेवरील पालकांच्या एकूण 11 लाख 15 हजार 760 विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये प्रतिविद्यार्थी याप्रमाणे 66 कोटी 94 लाख 56 हजार आर्थिक तरतूद मंजूर आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी दोन गणवेश संच गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावेत.

भारत सरकारच्या समग्र शिक्षा अंमलबजावणी आराखड्यातील निकषांनुसार मोफत गणवेश योजना ही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले तसेच दारिर्द्यरेषेखालील पालकांची मुले यांना लागू आहे. तसेच, सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षापासून संबंधित योजनेचा योजनेचा लाभ दारिर्द्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील गणवेश तसेच एकजोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

पहिलीच्या वर्गात प्रवेशित विद्यार्थी तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या निकषपात्र लाभार्थी विद्यार्थ्यांनाही दोन गणवेश संच वाटप करण्यात यावे. या योजनेच्या लाभापासून गणवेश पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विभागामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी गणवेश अथवा शासनमान्य वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जात असल्यास अशा लाभार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. एकाच विद्यार्थ्यास दुबार गणेशाचा लाभ देता येणार नाही.

ज्या महानगरपालिकांकडून त्यांच्या स्व-निधीमधून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येतो. अशा विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेशाचा दुबार लाभ देण्यात येऊ नये. शालेय गणवेशाचा रंग, प्रकार आदी बाबी संदर्भात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या स्तरावर शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे.

गणवेशाची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची

मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या गोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेशाचा रंग व रचना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित करावी. ज्या शाळांमध्ये स्काऊट, गाईड हा विषय आहे, अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंगसंगती शाळा स्तरावर निश्चित करावी.

तसेच, दुसरा गणवेश स्काऊट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी शाळास्तरावर वाटप करण्यात आलेल्या गणवेशाची तपासणी करावी. गणवेशासंदर्भात तक्रार उपस्थित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहणार असल्याचेदेखील स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news