Mahapareshan's power network for industry
जे.ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर शहर आणि लगतच्या परिसरातील झपाट्याने वाढणारे औद्योगीकरण, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक आणि कायगाव टोकापर्यंतचा वाढता कृषी भार (लोड) पेलण्यासाठी महापारेषणने शहराभोवती अतिउच्चदाब उपकेंद्रांचे (सबस्टेशन्स) भक्कम जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. या मास्टरप्लॅनमुळे शहराच्या औद्योगिक आणि ग्रामीण भागातील विजेचा ताण दूर होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता जयंत विके यांनी दिली.
वाढते औद्योगिकरण आणि शहराच्या विस्तारामुळे भविष्यातील वाढती वीज मागणी लक्षात घेऊन महापारेषणने सबस्टेशनचे जाळे विणण्यास सुरूवात केली आहे. शेंद्रा एमआयडीसी, आरीक सिटी, तसेच वाळूज एमआयडीसीत येणाऱ्या नवीन कंपन्या आणि त्यांची विजेची गरज लक्षात घेऊन परदरी किंवा गाधेली, दहेगाव बंगला येथील मुर्मी, तसेच बिडकीन आदी ठिकाणी हे जाळे उभारण्यात येत आहे.
आरिकसीटीत मागणी वाढलीच तर भविष्यात ४०० केव्हीच्या उपकेंद्राचे नियोजनही करण्यात आले आहे. दरम्यान शेंद्रा एमआयडीसीसाठी उपयुक्त असे बिडकीन उपकेंद्र डिसेंबरअखेर कार्यान्वित होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता अंजना ठक्कर यांनी दिली.
कृषी फिडर्सना स्थैर्य
कायगाव टोका पट्ट्यातील शेतीपंपांचा भार वाढल्याने वारंवार कमी दाबाने वीजपुरवठा किंवा ट्रिपिंगची समस्या उद्भवते. उपकेंद्रांचे नवे जाळे कार्यान्वित झाल्यानंतर कृषी फिडर्सवरील भार विभागला जाऊन शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंड वीज मिळेल. तसेच उद्योगांना अखंड वीजपुरवठा आवश्यक असतो. नवीन रिंग-सिस्टीममुळे एका लाईनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱ्या मार्गान तत्काळ वीजपुरवठा सुरू ठेवणे शक्य होणार आहे. दर्जेदार वीज पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मराठवाड्यात येणाऱ्या नवीन बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विश्वास वाढणार असल्याचीही माहिती विके यांनी दिली.