

Relief for Maratha students following Date Patil's hunger strike
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांचा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. निर्णयानुसार अधिनस्त महाविद्यालयांना कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी यासाठी केलेल्या अमरण उपोषण, आंदोलनाचे हे यश असल्याचा दावा करण्यात आला आहे. मराठा समाजाला केजी ते पीजीपर्यंत ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळाव्यात, ही मागणी डॉ. दाते पाटील यांनी लावून धरली होती.
या मागणीसाठी त्यांनी शहरात ९ ते २४ ऑगस्ट २०२६ दरम्यान १६ दिवस अमरण उपोषण आंदोलनाचे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, भरत गोगावले, अतुल सावे आणि संजय सिरसाट यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.
सर्वकष सवलतींची मागणी कायम
दरम्यान सध्याच्या शासन निर्णयात दुरुस्ती करून तांत्रिक, अतांत्रिक व वैद्यकीय शिक्षणासह खासगी विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांमध्येही सवलती लागू कराव्यात, अशी मागणी डॉ. दाते पाटील यांनी केली आहे. नोकरीतील नियुक्त्या, पदोन्नती आणि वयोमर्यादेतील सवलतींचाही त्यात समावेश असावा, अशी भूमिका मांडली. मराठा आणि ओबीसी समाजातील प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अराजकीय आरक्षण ही संकल्पनाही त्यांनी मांडली आहे.