Maha Swachtha Abhiyan in the district from today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शनिवार, १३ जूनला सामूहिक स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्हा परिषदेचे सुमारे १०० अधिकारी गावागावांत जाऊन मोहिमेची पाहणी व मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रामीण भागातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या जागा, नद्या, ओढे, मंदिरे, शाळा, अंगणवाड्या तसेच गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर साचणारा प्लास्टिक व इतर कचरा हटविण्यावर या मोहिमेत विशेष भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसह शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदी विभागांचे कर्मचारी व अधिकारीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
मोहिमेच्या देखरेखीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच पंचायत समितीतील विविध विभागांचे प्रमुख अशा सुमारे १०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे अधिकारी विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, घरोघरी व व्यावसायिक आस्थापनांकडून वापर शुल्कही वसूल केले जाणार आहे.
धार्मिक स्थळे प्लास्टिकमुक्त घोषित करण्यासाठी मोहीम
दरम्यान, अजिंठा, वेरूळ, घृष्णेश्वर मंदिर आणि दौलताबाद किल्ला परिसरासह ऐतिहासिक व धार्मिक स्थळे प्लास्टिकमुक्त घोषित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. या स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.