Lumpy skin disease : लम्पी स्कीन आजाराचा शिरकाव, कन्नड तालुक्यातील पशुमालकांत भीतीचे वातावरण  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Lumpy skin disease : लम्पी स्कीन आजाराचा शिरकाव, कन्नड तालुक्यातील पशुमालकांत भीतीचे वातावरण

चार जनावरे बाधित

पुढारी वृत्तसेवा

Lumpy skin disease outbreak creates fear among livestock owners in Kannada taluka

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : जनावरांच्या लम्पी स्कीन या आजाराने आता तालुक्यात शिरकाव केला असून गेल्या आठ दिवसांत दोन गायींना व दोन वासरांना अशा चार गोवंशीय जनावरांना यांची लागण झाली आहे. अशी माहिती पशुसंवर्धन कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधनमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात गोवंशीय पशुधनाची संख्या बघता या आजाराची लागण झालेल्या जनावरांची संख्या अतिशय कमी आहे, असे पशुसंवर्धन कार्यालयाकडून सांगितले जात आहे. लम्पी स्कीन हा आजार संसर्गजन्य आहे. त्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका पशुसंवर्धन कार्यालयाकडून नुसता तोंडी सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो आहे.

या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव तालुक्यातील इतर ठिकाणी होण्या अगोदरच याला रोखण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभागाने आताच ठोस पाऊले उचलून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे पशुमालकांचे म्हणणे आहे. सोमवारी (ता. ११) कन्नड शहरातील एका शेतकऱ्याने लम्पी आजाराने बाधित असलेल्या एका गायीला उपचारासाठी शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले होते.

परंतु त्या गायीचे रक्त तपासणी व इतर कोणतेही उपचार न झाल्याने त्या शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली. तालुक्यात इतर ठिकाणीदेखील लम्पी बाधित जनावरे आहेत. पशुधन मालक स्वतःच्या खचर्चाने जनावरांवर औषधोपचार करत आहेत. त्यामुळे पशुधन मालकाला आर्थिक फटका बसतो आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळेत उपचार, नियमित रक्त नमुने तपासणी, मृत जनावरांचे पंचनामे आणि लोकजागृती आवश्यक आहे.

लम्पी हा आजार जनावरांना माशी चावल्यामुळे होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांचा गोठा नेहमीच स्वच्छ ठेवा. व रात्री कडुनिंबांच्या पाल्याचा धूर करावा. लम्पी संसर्गजन्य असल्यामुळे बाधित जनावरांना काही दिवसांसाठी मोकाट सोडू नका. त्यांना जागेवरच सकस व मूल्ययुक्त आहार द्या. लम्पीसदृश जरी आजार पशुधन मालकांना वाटला तरी नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करा. तपासणी व लसीकरणाच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
- डॉ. मिलिंद देशमुख सहआयुक्त पशुसंवर्धन कार्यालय,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT