Lumpy outbreak increasing in Kannada taluka, two animals die
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पाऊस काही पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नसून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान तर झालेच तर हा सततचा पाऊस पशुधनाच्या मुळावर उठला असून तालुक्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील जेहूर येथील दोन शेतकऱ्यांची दोन जनावरे दगावली असून परिसरातील पंधरा जनावरांना लागण झाली आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत असून गायी म्हशींमध्ये होणारा हा विषाणुजन्य आजार त्वचेवर गाठी येणे, ताप येणे, दूध उत्पादनात घट होणे अशी लक्षणे दर्शवतो. हा आजार माश्या, डास, गोचीड यांसारख्या कीटकांद्वारे एका जनावरातून दुसऱ्याकडे पसरणारा असल्याने गोठ्यात स्वच्छता राखणे आणि कीटकनाशक फवारणी करणे अत्यावश्यक आहे. तालुक्यातील जेहूर गावात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने शेतीस उपयोगी व जोडधंदा म्हणून या गावात दूध, दुभती जनावरे मोठ्या प्रमाणावर पाळली आहे.
लंपी आजार हा संसर्गजन्य रोग असल्याने अन्य जनावरांना याची लागण होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात सर्वे करून पाळीव जनावरांचे लम्पी आजारात आवश्यक असलेले लसीकरण आपल्या दवाखान्याचा वतीने पूर्ण झालेले असून, आपण संसर्ग झालेल्या जनावरांचे योग्य उपचारदेखील चालू असून शेतकऱ्यांना करावयाच्या प्राथमिक उपाय यासाठी देखील सूचना देत आहोत.सहयोग शिरोडे, पशुवैद्यकीय अधिकारी, जेहूर.
सततच्या पावसामुळे लम्पी आजार बळावणार
थंड व ओलसर हवामानामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे विषाणू सहज संसर्ग करतो. पावसामुळे गोठ्यांमध्ये ओलावा वाढतो. ओलसर जागा म्हणजेच माश्या, डास आणि गोचीड यांना वाढण्यासाठी पोषक वातावरण, हेच कीटक लम्पी विषाणूचे प्रमुख वाहक आहेत. पावसामुळे जनावरे बाहेर चरायला जाऊ शकत नाहीत, सगळी जनावरे गोठ्यात एकत्र राहतात. त्यामुळे एक आजारी जनावर संपूर्ण कळपाला संसर्ग देऊ शकते. सतत ओला कचरा, साचलेले पाणी, शेण आणि मूत्रामुळे जंतू व कीटक वाढतात. त्यामुळे आजाराची जोखीम वाढते, असे पशुपालकांचे म्हणणे आहे.