Loose edible oil puts consumers' health at risk
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सुट्या खाद्यतेलात भेसळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशाप्रकारे खाद्यतेल विक्री करण्यावर बंदी आहे. मात्र बाजारात सुट्या खाद्यतेलाची सर्रास विक्री केली जाते. यामुळे हजारो ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना एफडीएचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
राज्यभरात सेफ फूड, सेफ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न पदार्थ मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांना कडक नियमांची जाणिव करून देण्यासोबतच संशयास्पद, निकृष्ट दर्जाचा माल जप्ती आणि थेट परवाने रद्द करण्यापर्यंत कारवाई सुरू आहे. मात्र सुट्या खाद्यतेल विक्रीकडे कानाडोळा केला जात आहे. या सुट्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या पाम तेल किंवा इतर घातक रासायनिक तेलाची भेसळ असण्याची दाट शक्यता असते. हे तेल वापरल्याने हृदयविकार, पोटाचे विकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळते.
थेट कारवाई कधी ?
अन्न प्रशासनाने गेल्या दीड महिन्यात प्रतिबंधित पान मसाला व गुटखा विक्रेत्यांपासून ते हॉटेल्स, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, पेयजलसह नुकतीच दोन बड्या खाद्यतेल रीपॅकिंग कंपन्यांवर कारवाई करत सुमारे तीन कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त केले. त्यांचे परवानेही रद्द केले आहे. त्यामुळे सुट्या खाद्यतेल विक्रीवर कारवाई कधी होणार याकडे शेकडो ग्राहक, नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सुट्या खाद्यतेल विक्रीवर बंदी का ?
भेसळ नियंत्रण : सुट्या तेलामध्ये पामतेल, निकृष्ट प्रतीचे तेल, किंवा धोकादायक रसायनांची भेसळ होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
स्वच्छता आणि गुणवत्ता : उघड्यावर ठेवल्यामुळे हवेतील घटक, धूळ किंवा गंजलेल्या बैरैलमुळे तेल दूषित होते. ग्राहकांचे आरोग्य : भेसळयुक्त तेल खाण्यामुळे हृदयविकार, पचनाच्या समस्या आणि गंभीर आजार होऊ शकतात.
पॅकिंगमध्येच तेल विक्री बंधनकारक
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार खाद्यतेल पॅकिंगमध्ये विकणे बंधनकारक आहे. प्रत्येक खाद्यतेलावर उत्पादकाचे नाव, बॅच नंबर, पॅकिंगची तारीख, एक्सपायरी डेट आणि घटकांची सविस्तर माहिती असणारे लेबलिंग बंधनकारक आहे. सुट्या तेलाच्या विक्रीवर कायद्याने पूर्णपणे बंदी आहे. मात्र, शहरातील अनेक किराणा दुकाने, आठवडी बाजारात, दुकानांमध्ये खुल्या डब्यातून तेल विकले जात आहे.