Lokmanya Tilak Punyatithi : Why did Tilak visit Nanded, Latur?
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते लोकमान्य टिळक हे मराठवाड्यातील नांदेड, लातूर दौर्यावर आले होते, अशा नोंदी उपलब्ध आहेत. या दौर्यामागे व्यक्तिगत कारणे असले तरी या भागातील जनतेला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे हा हेतूही त्यामागे होता, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.
मराठवाड्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत तात्यासाहेब कानोले यांनी लो. टिळक यांच्या नांदेड दौर्याची दिलेली माहिती जि.प. च्या वेबसाइटवर आहे. १९०३ मध्ये लोकमान्य टिळक त्यांचे स्नेही खापर्डे यांच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी धर्माबाद तालुक्यातील करखेली येथे रेल्वेने आले होते. तेथून बैलगाडीचा कष्टमय प्रवास करुन कुबेर जहागिरीला गेले. परत जाताना लोकमान्य नांदेडला उतरले. नांदेडच्या गोदावरीतही पोहण्याचा आनंद घेतला, अशी माहिती त्यात देण्यात आली आहे.
टिळकांच्या दौऱ्या दरम्यान स्थानिक देशभक्त आणि जनतेने त्यांचे रेल्वे स्थानकांवर अभूतपूर्व स्वागत केले होते. यावेळी त्यांनी स्थानकांवरच छोटेखानी भाषणे केली. त्यामुळे त्यावेळी केलेल्या भाषणांना स्टेशन भाषणे असे नाव मिळाल्याचे संदर्भ आहेत. मराठवाड्यात निझामाची राजवट होती. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सव कसा करता येईल याबाबत टिळकांनी चर्चा केली. करखेली, धर्माबाद आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यात या विचारांचा खूप मोठा प्रभाव पडला. त्यांच्या भेटीच्या आणि भाषणांच्या प्रेरणेतून या भागात अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात आणि सशस्त्र क्रांतीच्या चळवळीत सक्रिय झाले, अशी नोंद इतिहासात आहे.
लातुरात उघडला कारखाना
१८९० साली लो. टिळकांनी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चा राजीनामा दिल्यानंतर उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला. १८९१ साली त्यांच्याच निवासस्थानी कायद्याचे वर्ग सुरु केले. याच काळात टिळकांनी, उत्पन्नही वाढावे आणि स्वदेशीला प्रोत्साहन मिळावे म्हणून काही रक्कम गुंतवून अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आणि आबासाहेब परांजपे या दोन भागीदारांसह लातूर येथे सूतगिरणी सुरु केली. लातूर हे निझाम संस्थानचे कापसाचे केंद्र होते. आपल्याच देशात कच्च्या मालावर प्रक्रिया करून उद्योग उभारावेत, असे त्यांना वाटत असे. या सूतगिरणीसोबत टिळकांचा संबंध डिसेंबर १९०० पर्यंत राहिला. दुर्देवाने मिल जास्त काळ चालू शकली नाही. परंतु त्यामुळे लातुरात स्वातंत्रचळवळीचे वारे वाहू लागले. टिळकांच्या लातूर दौर्यानंतर निझामाने लातुरात कोर्टाची स्थापना केली. लातूर शहराचे उद्योजकीय महत्व ध्यानात घेत लातूर ते बार्शी असा पक्का रस्ता तयार केला.
संभाजीनगरात बलवंत वाचनालय
छत्रपती संभाजीनगरात पैठणगेट येथे लो. टिळकांचा पुतळा असून, सार्वजनिक आंदोलनाचे ते प्रमुख केंद्र आहे. या पुतळ्यानजिकच्या भागाला टिळक पथ असे संबोधिले जाते. निझामी राजवटीमुळे मराठी संस्कृतीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे समाजात जनजागृती व्हावी म्हणून टिळकांच्या मृत्यूनंतर संभाजीनगरात बलवंत वाचनालय सुरू करण्यात आले. त्यामागे टिळकांच्या विचारांची प्रेरणा होती. या वाचनालयाने शंभरी पार केली आहे, हे विशेष. याशिवाय एका खटल्याच्या कामकाजासाठी टिळक नेहमी शहरात येत असत. तेव्हा ते आवर्जून कोर्टात जाण्यापूर्वी ग्रामदैवत श्री. संस्थान गणपतीचे दर्शन घेत. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. हा खटला टिळकांनी जिंकला, हे विशेष.