Sambhajinagar Crime : दोन घरांचा प्रपंच चालविण्यासाठी दुचाकी चोरीचा उद्योग  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : दोन घरांचा प्रपंच चालविण्यासाठी दुचाकी चोरीचा उद्योग

स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल चोराला पकडून ९ दुचाकी केल्या जप्त

पुढारी वृत्तसेवा

Local Crime Branch arrests thief and seizes 9 two-wheelers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोन घरांचा प्रपंच चालविण्यासाठी दुचाकी चोरी करून कवडीमोल भावात विक्री करण्याचा उद्योग करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई रविवारी (दि.१२) फुलंब्री भागात करण्यात आली. पठाण गोसखॉ कालेखॉ (३५, रा नानेगाव, सिल्लोड, ह. मु. पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी दिली.

स्थानिक गुन्हे शाखेला एकजण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी फुलंब्री ते सिल्लोड रस्त्यावरील काथार पेट्रोलपंपच्या मागे येणार असल्याची माहिती मिळावी. पथकाने सापळा रचून आरोपी पठाणला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.

फुलंब्री, चिकलठाणा, वैजापूर, गंगापूर, वैजापूर, एमआयडीसी वाळूज, चाळीसगाव, संगमनेर (अहिल्यानगर), हसूल या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या ९ दुचाकी पेट्रोल पंपाच्या मागे लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी सर्व दुचाकी जप्त करून त्याला फुलंब्री पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्न पूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, एपीआय संतोष मिसळे, सुधीर मोटे, जमादार विठ्ठल डोके, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, अनिल चव्हाण, समाधान दुबेले, राहुल गायकवाड, सनी खरात, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली.

५ ते १० हजारांत विक्री

आरोपी पठाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तो हॅन्डल तोडून, मास्टर चावीचा वापर करून दुचाकी चोरी करून अवघ्या ५ ते १० हजारांत विक्री करतो. त्याला दारूचेही व्यसन असून, पैसे कमी पडले की दुचाकी चोरतो, असे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT