

Kohinoor College sealed again
खुलातबाद, पुढारी वृत्तसेवा : कोहिनूर महाविद्यालयाने एका फायनान्स कंपनीचे कोट्यवधी रुपये थकविल्याने कंपनीने न्यायालयाच्या आदेशाने महाविद्यालयास रविवारी (दि १२) सील ठोकले. महाविद्यालय प्रशासनाने वाहन, यंत्रसामग्री किंवा इतर कर्जाची परतफेड न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
वर्षभरापासून विविध कारणांमुळे चर्चेत असलेले कोहिनूर महाविद्यालयाला रविवारी पुन्हा एकदा सील ठोकले. कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी महाविद्यालयाची इमारत आणि जागा गहाण ठेवून एका फायनान्स कंपनीकडून तब्बल २ कोटी ८२ लाख ८६ हजार २५४ रुपये कर्ज घेतले होते.
कोहिनूर शिक्षण संस्था, मझहर खान आणि आस्मा खान यांनी कर्जाच्या परतफेडीपोटी सुरूवातीचे फक्त चारच हप्ते भरले. या कर्जाची परतफेड केली नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशनरच्या उपस्थितीत कंपनीने रविवारी महाविद्यालयाच्या इमारतीला सील ठोकून ही मालमत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे ऐनदिवाळीतच ही कारवाई झाल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
फेब्रुवारी २०२३ मध्ये चौथा आणि शेवटचा हप्ता भरण्यात आला. त्यानंतर मात्र कर्जाच्या परतफेडीपोटी एकही हप्ता भरण्यात आला नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीने १२ मार्च २०२५ रोजी कोहिनूर शिक्षण संस्था, मझहर खान आणि आस्मा खान यांना डिमांड नोटीस बजावून ६० दिवसांच्या आत कर्जाच्या पूर्ण रकमेची परतफेड करण्यास सांगितले. तरीही संस्थेने कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती त्यानुसार वरील निर्णय देण्यात आला.
या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षण सुरू राहणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशी वेळ आली असल्याचा आरोपही काही स्थानिकांनी केला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.