Diwali Shopping : दिवाळीच्या खरेदीला सुरुवात, बाजारात चैतन्य
Diwali shopping begins, enthusiasm in the market
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे यंदा नवरात्र-दसऱ्याच्या मुहूर्तावर होणाऱ्या व्यवसायाला फटका बसला. या आर्थिक धक्यातून सावरणाऱ्या बाजारपेठेला आता दिवाळी पाडव्याचे वेध लागले आहेत. लहान-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी फुल टू स्टॉकसह ग्राहकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर मदत लवकरात लवकर मिळावी, जेणे करून बाजारपेठेला उभारी मिळेल, अशी अपेक्षाही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कुठल्याही वस्तूची खरेदी तसे तर वर्षभर सुरूच असते. मात्र सणासुदीत मागणी वाढते. त्यामुळे व्यापारी वर्ग दरवर्षी दसरा दिवाळीची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत असतो. यंदाचा नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या व्यवसायावर अतिवृष्टीने पाणी फेरले. या दिवसांत अपेक्षित व्यवसाय न झाल्याने हवालदिल व्यापाऱ्यांच्या नजरा दिवाळी पाडव्याकडे लागल्या आहेत. हा प्रकाशाचा उत्सव तोंडावर आल्याने बाजारात सध्या चैतन्य आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे.
अतिवृष्टीवर शासनाकडून जाहीर झालेली मदत आणि कामगारांना बोनसही मिळणार असल्याने हा व्यवसाय कॅश करण्यासाठी रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन बाजार सराफा बाजारात नवी स्टॉकसह सज्ज आहे. दिवाळीच्य खरेदीला ग्राहकही बाहेर पडल्याने रविवारी (दि.१२ शहरातील पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा मच्छलीखडक, रंगारगल्लीसह विविध भागांतील दुकानांवन खरेदींसाठी ग्राहकांची लगबग सुरू होती.
व्यापाऱ्यांमध्ये उत्साह
अतिवृष्टीमुळे दसऱ्याला अपेक्षित व्यवसाय झाला नाही. आता शासनाने अतिवृष्टीवर मदत जाहिर केली. कामगारांना बोनसही मिळणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य, उत्साह आहे. दिवाळीनिमित्ताने रेडीमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन बाजार, सराफा बाजार नवी स्टॉकसह सज्ज असून, खरेदीची लगबगही सुरू झाली आहे.

