Link the Clean Streets app to CCTV cameras
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शोभेल अशा दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश गुरुवारी (दि.५) मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. स्मार्टसिटी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विविध प्रकल्पांची प्रगती तपासताना त्यांनी स्वच्छता, वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर विशेष भर दिला. शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणे, अवैध फ्लेक्स-बॅनर लावणे आणि विस्कळीत पार्किंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे नमूद करत आयुक्तांनी या बाबींवर कडक कारवाईचे संकेत दिले.
शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यटननगरीला शोभेल अशा दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश गुरुवारी स्मार्टसिटी कार्यालयातील बैठकीत जी श्रीकांत यांनी दिले.
शहरातील स्वच्छतेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी क्लीन स्ट्रीट्स अॅप स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी थेट लिंक करण्यात येणार असून त्यांनी या अॅपच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या अॅपचे येत्या आठवड्यात लोकार्पण करून ते कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर नागरिक मित्र पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
यामुळे नागरिकांमध्ये शिस्त आणि स्वच्छतेबाबत जागृती निर्माण होईल. यासह नागरिकांच्या तक्रारी तातडीने नोंदवून त्यावर कारवाई करण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान संत तुकाराम नाट्यगृह आणि बस डेपोच्या रखडलेल्या कामांबाबत आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही दोन्ही कामे शहरासाठी महत्त्वाची असून, ती तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत आणण्याचे निर्देश दिले. तर कामांमध्ये अनावश्यक विलंब होता कामा नये, अशी या संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर ताकीद संबंधित यंत्रणांना देण्यात आली.
गरवारे स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असल्याने तेथील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन स्मार्ट पार्किंग प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले. या आढावा बैठकीस स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, मुख्य लेखाधिकारी उत्तम चव्हाण, शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर, प्रकल्प व्यवस्थापक इमरान खान, फैज अली, किरण आहे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इलेक्ट्रिक बस, स्मार्ट पार्किंगवर लक्ष
शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी इलेक्ट्रिक बस प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे नमूद करत, या कामात होणारा विलंब तत्काळ थांबवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. गरवारे स्टेडियम परिसरातील स्मार्ट पार्किंग प्रकल्प नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे राबवून वाहनचालकांना सुविधा देण्यावर भर देण्यात आला. खर्चाबाबत स्पष्ट भूमिका मांडताना आयुक्त श्रीकांत यांनी अनावश्यक खर्च टाळण्याच्या सूचना दिल्या. मात्र, जिथे खर्च आवश्यक आहे तिथे कोणतीही तडजोड न करता उत्कृष्ट गुणवत्ता राखण्याचे आदेश दिले.
वेळेत काम न केल्यास दंड
ठरलेल्या कालमयदित प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून शहराच्या वैभवात भर घालण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.