

Fraud of Rs 40 lakhs by taking mutual loan on flat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फ्लॅटची नोंदणीकृत इसार पावती झालेली असतानाही, ग्राहकांना अंधारात ठेवून फ्लॅटवर परस्पर ४० लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २०१५ ते २०१९ या काळात दि यवतमाळ अर्बन को-ऑप बँकेत घडला. बिल्डर मधुसूदन दिलीपराव उत्तरवार आणि बँकेचा मॅनेजर संजय उत्तरवार अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राजेंद्र प्रल्हाद सानप (४९, रा. बसैयेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी २०१५ मध्ये बसैयेनगर भागातील प्लॅटीनम व्यंकटेश्वरा अपार्टमेंटमध्ये बिल्डर मधुसूदन दिलीपराव उत्तरवार यांच्याकडून ३५ लाख रुपयांत फ्लॅट खरेदीचा सौदा केला होता. सानप यांनी वेळोवेळी बिल्डरला ७ लाख रुपये देऊन १९ ऑक्टोबर २०१५ रोजी फ्लॅटची नोंदणीकृत इसारपावती देखील करून घेतली. त्यावेळी बिल्डरने या फ्लॅटवर कोणतेही कर्ज नसल्याचे सांगितले होते. सानप यांनी उर्वरित रकमेसाठी दुसऱ्या बँकेतून कर्ज काढून जुलै २०१९ मध्ये फ्लॅटची रजिस्ट्री केली आणि ते तिथे राहण्यास गेले.
बँकेची नोटीस आल्याने प्रकार उघड
सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांना दि यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (शाखा सारंग सोसायटी) यांच्याकडून नोटीस मिळाली. चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली की, सानप यांची इसारपावती झालेली असतानाही बिल्डरने बँक मॅनेजरशी संगनमत करून ३१ मार्च २०१६ रोजी त्याच फ्लॅटवर कर्ज उचलले होते.
दोन महिन्यांत कर्ज निल करण्याची थाप
सानप यांनी बिल्डर उत्तरवारकडे आमच्या फ्लॅटवर कर्ज कसे काय घेतले असा जाब विचारला. तेव्हा त्याने दोन महिन्यांत तुमच्या फ्लॅटवरील कर्ज निल करून देतो असे म्हणत वेळकाढूपणा केला. त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. सानप यांनी वकिलामार्फत बँक मॅनेजर आणि बिल्डर दोघांना नोटीस पाठवली. मात्र, त्याचेही दोघांनी उत्तर दिले नाही.
मॅनेजर आणि बिल्डरचे संगनमत
बिल्डर मधुसूदन उत्तरवार याने तक्रारदार सानप, तसेच डॉ. रश्मी गुजराती व इतर एक अशा तीन फ्लॅटवर तत्कालीन बँक मॅनेजर संजय उत्तरवार याच्या मदतीने ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले. वारंवार विचारणा करूनही बिल्डरने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि दि यवतमाळ अर्बन बँकेच्या शाखेत जाऊन विचारणा केली तेव्हा त्यांनीही खरी माहिती लपवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अरुणा घुले करत आहेत.