Crime News : पाणीपुरीचे पैसे मागितल्याने विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पाणीपुरीचे पैसे मागितल्याने विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

सेंट्रल नाक्यावरील थरार; फेक ऑनलाईन पेमेंट करून टोळक्याचा राडा

पुढारी वृत्तसेवा

Life-threatening attack on a vendor after he asked for payment for panipuri

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सेंट्रल नाका परिसरात १४० रुपयांच्या खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चार अनोळखी गुंडांनी एका पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ऑनलाईन पेमेंट जमा न झाल्याचे सांगताच, आम्ही काय फुकट खाणारे दिसलो काय? असे म्हणत या गुंडांनी विक्रेत्याच्या डाव्या कानावर आणि उजव्या गळ्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. १२) रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र जयराम कुशवाह (२७, रा. अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. जितेंद्र यांच्या तक्रारीनुसार, नेहमीप्रमाणे सेंट्रल नाका स्मशानभूमीच्या बाजूला पाणीपुरीची हातगाडी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास चार अनोळखी तरुण त्यांच्या गाडीवर आले आणि त्यांनी १४० रुपयांची पाणीपुरी खाल्ली. खाल्ल्यानंतर आरोपींनी मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंट केल्याचे भासवले. मात्र, जितेंद्र यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा कोणताही संदेश न आल्याने त्यांनी, मला खात्यावर पैसे आले नाहीत, माझे पैसे द्या असे त्या तरुणांना सांगितले.

पैसे मागितल्याचा राग अनावर झाल्याने आरोपींनी जितेंद्र यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केला. आम्ही तुला फुकट खाणारे दिसलो काय ? असे ओरडत चौघांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. जितेंद्र स्वतःचा बचाव करत असतानाच, टोळक्यातील एकाने कमरेचा धारदार चाकू बाहेर काढला आणि जितेंद्र यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डाव्या कानावर आणि उजव्या बाजूच्या गळ्यावर चाकूने खोलवर सपासप वार केले.

या हल्ल्यात जितेंद्र यांच्या कानातून आणि गळ्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळताच चौघेही हल्लेखोर पसार झाले. यावेळी शेजारीच कपड्यांची हातगाडी लावणारे व्यावसायिक शेख रियाजोद्दीन यांनी जखमी जितेंद्र यांना तत्काळ उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

व्यावसायिकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

शहरात सराईत गुन्हेगार, नशेखोर आणि टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या आठ दिवसांत व्यावसायिकांवर जीवघेणे हल्ला झाल्याची ही तिसरी घटना आहे. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन ते जय भवानी नगर रस्त्यावरील मेडिकल चालक मिथुन जैस्वाल यांच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी करत सराईत गुन्हेगार वैभव शिंदे, विजय जगताप आणि कार्तिक बामणे या तिघांनी पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि गल्ल्यातील रोकड लुटली होती.

तर वेदांतनगर ठाण्याच्या हद्दीतील अहिल्याबाई होळकर चौकात तडीपार गुंड विशाल ऊर्फ विशू संजय नाथभजन याने फुकट पाणीपुरी खाऊन पैशांची मागणी करत पाणीपुरी व दाबेली विक्रेत्यांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT