Abortion Racket : यूट्यूबवर शिकला लिंगनिदान; वॉर्डबॉय चालवत होता गर्भपात रॅकेट file photo
छत्रपती संभाजीनगर

Abortion Racket : यूट्यूबवर शिकला लिंगनिदान; वॉर्डबॉय चालवत होता गर्भपात रॅकेट

पोलिसांनी डमी पेशंट पाठवून दोघांना ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Learned Sex Determination on YouTube; Ward Boy Ran Abortion Racket

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नारेगाव भागात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात आणि लिंगनिदान रॅकेटची पाळेमुळे अतिशय खोलवर असल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी शनिवारी पिसादेवी भागात सापळा रचून मुख्य सूत्रधार फरार डॉ. सतीश सोनवणे याच्या दोन खास हस्तकांना अटक केली.

धक्कादायक म्हणजे, यातील मुख्य आरोपी केवळ १२ वी पास असून त्याने चक्क यूट्यूबवरून लिंगनिदान करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. वार्डबॉय राहुल माणिकराव झोंड (२८, रा. मयूरपार्क) आणि डॉ. सोनवणेचा जुना चालक सोमनाथ परसराम बारसे (३१, रा. कमळापूर, वाळूज) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी शनिवारी (दि.२१) दिली. राहुल १२ वी तर सोमनाथ १० वी पास आहेत.

नारेगावातील अवैध गर्भपात प्रकरणाचा एमआयडीसी सिडकोचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव आणि सहायक निरीक्षक कैलास लहाने यांना हे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. तपास करताना पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला डमी पेशंट बनवून आरोपींशी संपर्क साधला. लिंगनिदानासाठी १४ हजार रुपयांचा सौदा ठरला.

ठरल्याप्रमाणे राहुल झोंड आणि सोमनाथ बारसे शनिवारी पिसादेवी परिसरात कारमधून आले. तिथे पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी प्रोब आणि एक टॅब जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई हवालदार गणेश डोईफोडे, देविदास काळे आणि त्यांच्या पथकाने यशस्विरीत्या पार पाडली. जेलमध्ये ठरला बिझनेस प्लॅन मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे जेव्हा हसूल कारागृहात होता, तेव्हाच त्याने या रॅकेटचे जाळे विणले होते.

१२ वी पास राहुल झोंड याने शहरातील एका नामांकित रुग्णालयात वॉर्डबॉय आणि ओटी असिस्टंट म्हणून काम केल्याने त्याला वैद्यकीय क्षेत्राची जुजबी माहिती होती. उर्वरित ज्ञान त्याने युट्यूबवरून मिळवले आणि तो अवैधपणे लिंगनिदान करू लागला. तर १० वी पास असलेला सोमनाथ बारसे हा डॉ. सोनवणेचा जुना चालक असून, टॅब हाताळणे आणि लोकेशन शोधण्यात तो पटाईत आहे.

सूत्रधार डॉ. सोनवणे अद्याप फरार

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे आणि महालॅब कर्मचारी महिलेचा पती सपकाळ हे दोघेही अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांच्या मागावर असून, त्यांच्या अटकेनंतर शहरातील काही बड्या रुग्णालयांचे आणि लॅबचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT