

छत्रपती संभाजीनगर : कुख्यात गुन्हेगार फैजल ऊर्फ तेजा याने गोळी झाडून जखमी केलेली त्याची मैत्रीण आणि दोन साथीदारांना एनडीपीएसच्या गोळ्या, पिस्तूलसह सापळा रचून बेड्या ठोकल्या. ही कारवाई मंगळवारी (दि.२३) रात्री नगर नाका ते तीसगाव फाटादरम्यान करण्यात आली.
तुषार आगळे पथकाने नशेच्या राखी गणेश मुरमुरे (२६, रा. वरणगाव फाटा, नांदेड), अमोल लक्ष्मण इंगळे (३०) आणि तुषार निवृत्ती आगळे (३१, दोघेही रा. पुंडलिकनगर) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी रत्नाकर नवले यांनी बुधवारी (दि. २४) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नगर रोडवर होंडा अमेज कारमध्ये (एमएच-२०-एफयू-०६१५) निट्रोसॅन १० नावाच्या गोळ्या, गावठी कट्टा, जिवंत काडतूस बाळगून एक महिला आणि दोन जण येणार असल्याची माहिती एनडीपीएस पथकाचे एपीआय विनायक शेळके यांना मिळाली होती. त्यांनी पीएसआय अमोल म्हस्के यांच्या पथकासह रेल्वे उड्डाणपुलाच्या पुढे सापळा लावला.
दामिनी पथकाच्या पीएसआय कांचन मिरधे यांनाही कारवाईत घेतले. रात्री पावणे अकराच्या सुमारास कारमध्ये तिन्ही आरोपी दिसले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यांच्याकडे नशेच्या ९९ गोळ्या, गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच कागदी ५ बंडल त्यात प्रत्येक बंडलवर आणि खाली एक ५०० रुपयांची नोट आत मध्ये कोरे कागद असा ऐवज सापडला. पोलिसांनी तिघांना अटक करून मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वाळूज पोलिस ठाण्याकडे देण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, एसीपी अशोक राजपूत, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय विनायक शेळके, पीए-सआय अमोल म्हस्के, कांचन मिरघे, हवालदार लालखा पठाण, नितेश सुंदर्डे, सतीश जाधव, छाया लांडगे, विलास मुठे, संतोष चौरे, निर्मला निंभोरे, साक्षी चंद्रे यांच्या पथकाने केली.
कोण आहे ही राखी मुरमुरे ?
राखी मुरमुरे ही मूळची नांदेडची असून, तिचे वडील पोलिस दलात कार्यरत आहेत. मात्र ती शहरातील कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल ऊर्फ तेजा आणि जावेद शेख ऊर्फ टिप्या यांच्या संपर्कात आल्याने गुन्हेगारीकडे वळली.
तेजाकडून गोळीवार : ११ ऑगस्ट २०२५ रोजी कुख्यात तेजाने कारागृहातून सुटल्यानंतर घरातच तिच्यावर गोळीबार केला होता, ज्यात ती हाताला गोळी लागल्याने जखमी झाली होती. तेजाची पोलिसांनी टक्कल करून शहरभर धिंड काढून बेड्या ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे हसूल जेलबाहेर तेजाच्या स्वागतासाठी राखी भलामोठा फुलांचा हार घेऊन गेली होती.
अट्टल गुन्हेगारांशी संबंध : राखीने पिस्तूल अंबडचा कुख्यात गुन्हेगार किशोर जाधव याच्याकडून आणले होते. किशोर आणि राखी या दोघांचेही वडील पोलिस खात्यात असूनही हे दोघे गंभीर गुन्हेगारीत अडकले. त्यानंतर पुन्हा एकदा राखौला पिस्तूलसह वर्षभरानंतर एनडीपीएसच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे.
फायरिंगचा व्हिडिओ:
ऑक्टोबर २०२४ मध्ये राखीचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी सिटी चौक पोलिसांनी तिला पिस्तूल आणि दोन चाकूसह अटक केली होती.
आमदारावरील आरोपामुळे चर्चेत : एका माजी आमदारावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी बुलढाण्यातील एक आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्याने तिला धमकी दिल्याचा तिने आरोप केला होता. सातारा पोलिस ठाणे आणि पोलिस आयुक्तालयात तिने तसा तक्रार अर्ज दिला होता.