Voter List : मतदार याद्यांवरील आक्षेपांसाठी राहिले शेवटचे तीन दिवस File Photo
छत्रपती संभाजीनगर

Voter List : मतदार याद्यांवरील आक्षेपांसाठी राहिले शेवटचे तीन दिवस

आकडा वाढण्याची शक्यता : आतापर्यंत २३०० तक्रारी दाखल

पुढारी वृत्तसेवा

Last three days left for objections on voter lists

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : महापालिका निवडणुकीच्या तयारीत सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदार याद्या गोंधळाच्या विळख्यात अडकल्या आहेत. एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात, नावांमध्ये चूक, पत्त्यात विसंगती, कुटुंबातील सदस्य वगळणे किंवा अनावश्यक नावे समाविष्ट होणे अशा अनेक त्रुटींमुळे शहरभरातून आक्षेपांची लाट उसळली असून, आतापर्यंत २३०० आक्षेप दाखल झाले आहेत. त्यापैकी सुमारे एक हजार आक्षेप निकाली काढण्यात आक्षेप असून, नोंदवण्यासाठी तीन दिवस शिल्लक असल्याने हरकती व आक्षेपांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर घोळ असल्याचे समोर आल्यानंतर आ क्षेपांचा अक्षरशः पाऊस पडला. शुक्रवार (दि.२८) पर्यंत तब्बल २३०० आक्षेप नोंदवण्यात आले असून, त्यातील हजारावर आक्षेपांचा मनपा निवडणूक विभागाकडून निपटारा करण्यात आला आहे. तसेच आक्षेपांची वाढती संख्या लक्षात घेता, प्राधिकृत अधिकारी आणि प्रगणकांनी पडताळणीची गती वाढवली असून, प्रत्येक आक्षेप दोन दिवसांत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

त्यासाठी नेमलेली पथके घराघरांत जाऊन पडताळणी करत आहेत. नागरिकांनी दिलेल्या माहितीत अचूकता राखली जावी यासाठी प्रत्यक्ष भेट, शेजाऱ्यांकडून पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची तपासणी या टप्प्यांतून प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आता आक्षेप आणि हरकती दाखल करण्यासाठी केवळ तीनच दिवस उरले असल्याने अजून किती तक्रारी समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याद्यांमधील त्रुटींमुळे अनेक नागरिकांची मतदानाची संधी धोक्यात येऊ शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. शिवाय काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचे चित्र असल्याने राजकीय पक्षांनीही निवडणूक विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

नागरिकांनी नावाची खात्री करून घ्यावी

निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अंतिम यादी तयार करण्यापूर्वी प्रत्येक आक्षेप गांभीर्याने घेऊन योग्य दुरुस्त्या केल्या जातील. मात्र वेळ अत्यल्प असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याआधी नागरिकांनी आपल्या नावाची खात्री करून घ्यावी, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. दरम्यान उर्वरित तीन दिवसांत आक्षेपांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT