

Record-breaking recovery of property tax from the Municipality for the first time
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
मालमत्ता करात महापालिकेने पहिल्यांदाच रेकार्ड ब्रेक वसुली केली आहे. आठ महिन्यांत १८९ कोटींवर महसूल जमा झाला आहे. चालू आर्थिक वर्ष संपायला अद्याप चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, वसुलीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट प्रशासनाला दिले आहे. शहरात मालमत्ताधारकांची सुमारे सव्वातीन लाख एवढी संख्या असून, त्यांच्याकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी मिळून ८१९ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
वसुलीत वाढ व्हावी यासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी शास्ती से आजादी व शास्ती से मुक्ती अभियान राबवण्यात आले. यात दंडमाफीतून अनुक्रमे ७५ व ५० टक्के सूट देण्यात आली होती. या विशेष सवलतीच्या मोहिमेअंतर्गत दंड माफीतून दिलासा मिळत असल्याने अनेक वर्षांपासून थकलेले करदाताही कर भरण्यास पुढे आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेत, थकीत कराचा भरणा करण्यास प्राधान्य दिले. या अभियानांतर्गत मनपाच्या तिजोरीत दररोज सरासरी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल जमा झाला.
त्यामुळे प्रथमच महापालिकेकडे आठ महिन्यांत १८९ कोटींची वसुली झाली. शास्ती से आजादी व शास्ती से मुक्ती या योजनांमुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढली होती. भविष्यात नियमितपणे कर भरण्याचा कल वाढण्याची अपेक्षा होती. या योजना थांबताच कराचा भरणा करण्याचा वेग मंदावला आहे. मात्र महापालिकेच्या पथकांकडून मालमत्ता कर वसुलीची मोहीम जोरदारपणे राबवण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित चार महिन्यांत वसुलीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीचा आकडा आठ महिन्यांतच टाकला मागे
मालमत्ता करापोटी महापालिकेच्या तिजोरीत गेल्या वर्षी १७३ कोटी रुपये जमा झाले होते. हा आकडा मागे टाकत केवळ आठ महिन्यांत यंदा १८९ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मनपाच्या तिजोरीत मालमत्ता कराचा प्रथमच इतक्या मोठ्याप्रमाणात महसूल जमा झाला असून, वसुली विभागाची यंदाची कामगिरी रेकॉर्ड ब्रेक ठरली आहे.