Land acquisition : अतिरिक्त डीएमआयसीसाठी भूसंपादन file photo
छत्रपती संभाजीनगर

Land acquisition : अतिरिक्त डीएमआयसीसाठी भूसंपादन

आठवडाभरात मोजणी ८ हजार एकर भूसंपादन, ६० टक्के शेतकऱ्यांनी दिली सहमती

पुढारी वृत्तसेवा

Land acquisition for additional DMIC

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डीएमआयसी-ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या पुढील टप्प्यातील विस्ताराला विरोध करीत शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दर्शविला होता. परंतु, आता ६० टक्के शेतकऱ्यांनी जमीन भूसंपादनास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे आता आठवडाभरात जमीन मोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

या भूसंपादन प्रक्रियेसाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत पाडळी, निलजगाव, घरडोन, घरडोन तांडा, खोडेगाव आणि गाडीवाट या गावांतील जमिनींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पाडळी येथील २१५.३० हेक्टर, निलजगाव ५८६.९२ हेक्टर, घरडोन ७०२.६८ हेक्टर, घरडोन तांडा ४६५.९६ हेक्टर, खोडेगाव ५९७.३२ हेक्टर आणि गाडीवाट येथील ४४२.१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

या सहा गावांतील क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज ३,०१०.२८ हेक्टर म्हणजे सुमारे ७,४३८ एकर इतकी होते. त्यामुळे बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. डीएमआयसी-ऑरीक बिडकीन परिसरात गेल्या काही वर्षांत औद्योगिक गुंतवणुकीला वेग आला आहे. वाहननिर्मिती, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उत्पादन क्षेत्रांतील उद्योगांसाठी पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. नव्या भूसंपादन प्रक्रियेमुळे आगामी काळात उद्योगांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

डीएमआयसीच्या विस्तारासाठी जमीन देण्यास बिडकीन परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून भूसंपादनाच्या मोजणीची प्रक्रिया रखडली होती. दोन ते तीन वेळा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या.

आमदार विलास भूमरे यांनीही शेतकऱ्यांशी चर्चा केली. अखेर येथील ६० टक्के शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन होण्यास मदत झाली असून विरोध मावळत आहे. आठवडाभरात सहमती दर्शविलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT