Sambhajinagar News : बाजार समितीच्या प्लॉटिंगवरून मनपा सभागृहात रणकंदन

एमआयएम सदस्याचे निलंबन : राजदंड पळविण्याचा प्रयत्न, भाजप-एमआयएममध्ये घोषणायुद्ध
Sambhajinagar News
Sambhajinagar News : बाजार समितीच्या प्लॉटिंगवरून मनपा सभागृहात रणकंदनfile photo
Published on: 
Updated on: 

Uproar in Municipal Corporation Hall over APMC Plotting

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील बेकायदा प्लॉटिंग आणि महापालिकेच्या खुल्या जागेच्या कथित विक्रीवरून शुक्रवारी (दि. १३) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा मुद्दा उपस्थित करत एमआयएमचे स्वीकृत सदस्य मोहम्मद असरार यांनी महापौर आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यावरून महापौर समीर राजूरकर यांनी असरार यांचे एका दिवसासाठी निलंबन केले.

Sambhajinagar News
Sambhajinagar Bus Stand : लाखो रुपये खर्चुनही मुख्य बसस्थानकांच्या नशिबी खड्डेच

या कारवाईने संतप्त झालेल्या एमआयएम नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. भाजप सदस्यांनी त्याला विरोध केल्याने सभागृहात घोषणायुद्ध आणि रेटारेटी झाली. निलंबित सदस्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नालाही एमआयएमने विरोध केला. सुमारे पाऊण तास चाललेल्या या गोंधळानंतर एमआयएमने सभात्याग केला. मात्र, मंत्र्यांच्या नावाच्या उल्लेखाने पुन्हा गोंधळ उडाला आणि अखेर महापौरांनी सर्व विषय मंजूर करून सभा आटोपती घेतली.

महापालिकेची सर्वसाधारण सभेचे शुक्रवारी महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी पिसादेवी येथील श्रीराम मंदिर मठाच्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. गट क्रमांक १२४ आणि १२५ मधील वर्ग दोनच्या जमिनीवर सते तयार करून पथदिवे बसविण्यात आले.

त्यानंतर बेकायदा प्लॉटिंग करून जागेची विक्री झाल्याचा आरोप त्यांनी केला. आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई सुरू केली; मात्र एक रस्ता तोडल्यानंतर आलेल्या फोनमुळे कारवाई थांबविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दीड महिना उलटूनही गुन्हे दाखल झाले नसल्याने संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : कोर्टात अर्ज दिल्याचा राग; दोघा भावंडांना रॉडने मारहाण

शिवाजी दांडगे यांनीही शहरातील अन्य भागांतील बेकायदा प्लॉटिंगवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर असरार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला. यापूर्वी या विषयावर लेखी उत्तरे देण्यात आली असून आयुक्तांकडे सुनावणी झाल्याने निर्णयाची प्रतीक्षा करावी, असे महापौरांनी सांगितले.

मात्र, महापालिकेची जमीन हडप करून विक्री करणाऱ्यांना प्रशासन आणि महापौर पाठीशी घालत असल्याचा आरोप असरार यांनी केला. सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन करूनही त्यांचा आक्रमकपणा कायम राहिल्याने महापौरांनी त्यांचे एका दिवसासाठी निलंबन केले. त्यानंतर एमआयएम सदस्यांनी नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा देत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.

भाजप सदस्यांनी जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा देत विरोध केला. सुरक्षा रक्षकांना असरार यांच्यापर्यंत पोहोचू न देता एमआयएम सदस्यांनी कडे केले. आदेशाचे पालन न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर एमआयएमने सभात्याग करून सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी एमआयएमचे ३६ नगरसेवक आहेत म्हणून त्यांची दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. जनतेच्या प्रश्नांऐवजी अन्य विषयांवर वेळ वाया घालवला जात असल्याचा आरोप करत आयुक्तांकडील प्रलंबित विषय निकाली काढण्याची सूचना केली. नगरसेवक अपात्रता प्रकरणाची फाईल काढण्याचाही सूचक इशारा त्यांनी दिला.

भाजप-एमआयएम संघर्षात शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक अलिप्त राहिले. उपमहापौर जंजाळ, गटनेते किशोर नागरे आणि ऋषिकेश जैस्वाल यांनीच हस्तक्षेप केला. तसेच नगरसेवक मनोज गांगवे यांनी गट क्रमांक १३८, १४१ तसेच ४, ५ आणि ६ मधील बेकायदा प्लॉटिंगची माहिती मागितली. पुढील सभेत माहिती देण्याचे निर्देश महापौरांनी दिले. मूळ मालक, विकासक आणि जीपीएधारकांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

मंत्र्यांचे नाव घेताच पुन्हा गोंधळ

गोंधळ निवळल्यानंतर एमआयएम नगरसेवक पुन्हा सभागृहात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी पुन्हा मठाच्या जागेचा मुद्दा उपस्थित करत मंत्री अतुल सावे यांनी लक्ष घातले असते, तर हा प्रकार घडला नसता, असे विधान केले. त्यावर महापौरांसह भाजप सदस्यांनी आक्षेप घेतल्याने पुन्हा घोषणाबाजी झाली. या गोंधळातच महापौरांनी सर्व विषयांना मंजुरी देत राष्ट्रगीताने सभा संपविली. सभेनंतर भाजपने सावे यांच्या समर्थनार्थ, तर एमआयएमने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

खुल्या जागेचा वाद कायम

कृषी उत्पन्न बाजार समितीने महापालिकेकडे सादर केलेल्या ले-आऊटमध्ये खुली जागा महापालिकेसाठी राखीव होती. मात्र, प्रत्यक्षात जागा महापालिकेच्या ताब्यात आली नाही. ले-आऊटमध्ये वारंवार बदल करून खुल्या जागेची विक्री केल्याचा स्वीकृत नगरसेवक असरार यांचा आरोप आहे. तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांनी सुनावण्या घेतल्या होत्या. आयुक्त येडगे यांनीही ५६ जणांचे म्हणणे ऐकून घेतले.

श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांमध्ये माझे नाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. मात्र, ट्रस्टमध्ये माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नाव नाही. मठाच्या जागेवरील बेकायदा प्लॉटिंगविरोधात कारवाई सुरू झाल्यापासून मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रशासनही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.
- समीर राजूरकर, महापौर, छत्रपती संभाजीनगर महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.