

Intoxicated youths create a ruckus in front of the Guardian Minister's bungalow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुणांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास गोंधळ घातला. यात बंगल्यावरील सुरक्षा रक्षकांने हटकल्याने त्यांनी बंगल्याच्या दिशेने दारूच्या बाटल्या फेकल्या. तसेच बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सातारा पोलिसांनी रोहित स्वप्निल भुताळे (२४), शिवम ज्ञानेश्वर गायकवाड (२४) आणि प्रतीक चांगदेव कुटे (२५) या तीन उच्चशिक्षित तरुणांना अटक केली आहे.
शिरसाट यांच्या गोलवाडी लिंक रोडवरील निवासस्थानाबाहेर १२ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मोपेडवरून (एमएच-२३-बीआर-८५३४) तीन मद्यधुंद तरुण आले. त्यांनी सुरक्षारक्षक कमलेश परदेशी आणि संतोष महालकर यांच्याशी वाद घालत झटापट केली.
बंगल्याच्या दिशेने दारूची बाटली
फेकली, तर दुसरी बाटली फोडल्याचे सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तावरील पोलिस अंमलदार विजय दारुंटे यांना सांगितले. दारुंटे यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने तिघांना तेथून हुसकावले. मात्र, काही वेळातच तिघे पुन्हा परत येऊन निवासस्थानाच्या गेटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते असे तक्रारीत म्हटले आहे.
गोंधळ घालणारे रोहित भुताळे हा जर्मनीमध्ये अभियंता असून सायबर सिक्युरिटी विषयात पदव्युत्तर पदवीधारक आहे. तो सिडको एन- १ भागात राहतो. तर शिवम गायकवाडने औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरण विषयात एमएससी झालेले असून तो उल्का नगरीत राहतो.
प्रतीक कुटे औषधनिर्माण शास्त्रातील असून मेडिकल डिकोडिंगची खासगी नोकरी करतो. तो सरस्वती कॉलनीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या तरुणांनी गोंधळ नेमक्या कोणत्या कारणांमुळे घातला याचा तपास सुरू आहे.
ओएसडी आमच्या खिशात
दरम्यान पालकमंत्र्यांच्या वतीने दिलेल्या तक्रारीत त्या तिघांपैकी एकजण मी ओएसडी आहे, माझी वरपर्यंत ओळख आहे. मी चार ओएसडी खिशात घालून फिरतो. असे म्हटल्याचे नमूद आहे. तसेच शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा आणल्याचा आरोपही दारुंटे यांनी फिर्यादीत केला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन दारुंटे यांनी डायल ११२ वर संपर्क साधला. सातारा पोलिसांचे पथक काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रोहित भुताळे, शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे या तिघांना ताब्यात घेतले.