Robbery Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Theft : सिडकोत धुमाकूळ; व्यापाऱ्याचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

दुचाकीवर आले अन् एका तासात ८ कुलपे तोडली; साईनगर भागातील घटना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या कामासाठी सहकुटुंब मूळ गावी गेलेल्या एका व्यापाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना सिडको एन-६ मधील साईनगर भागात उघडकीस आली आहे.

पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी मुख्य दरवाजासह तब्बल ८ कुलपे तोडून तासाभारत ही चोरी केली. पुरावा सापडू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्हीचा 'डीव्हीआर' ही पळवला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मिलींद प्रभाकर मिते (६२, रा. घर क्र. १२५३, साईनगर, एन-६ सिडको) यांच्या तक्रारीनुसार, ते मूळ गाव पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) येथे शेतीची कामे करवून घेण्यासाठी २८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून कुटुंबासह गावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर अनेक दिवसांपासून बंद होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे भिते यांच्या बंद घराजवळ आले. त्यांनी अत्यंत शिताफीने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

त्यानंतर पहिल्या मजल्यावरील हॉल आणि बेडरूम, तसेच कपाटांचे लॉक आणि आतील लॉकर अशी घरातील तब्बल ८ कुलपे तोडली. अवघ्या एका तासाच्या आत त्यांनी संपूर्ण घर विस्कटून ऐवज बॅगेत भरला आणि पोबारा केला. १५ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भिते यांच्या घरी काम करणाऱ्या महिला सोनाली नन्नावरे या नेहमीप्रमाणे कामासाठी आल्या. तेव्हा घटना उघडकीस आली. मिते यांनी माहिती मिळताच घर गाठले.

चोरांची चलाखी; पुरावाच नेला सोबत

घरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने चोरटे आणि त्यांची दुचाकी कॅमेऱ्यात कैद झाली असेल, असा पोलिसांचा आणि घरमालकाचा अंदाज होता. मात्र हॉलची पाहणी केली असता चोरट्यांनी अत्यंत चलाखीने सीसीटीव्हीचा 'डीव्हीआर'च काढून नेल्याचे निष्पन्न झाले. स्वतःचा कोणताही पुरावा मागे राहू नये याची खबरदारी घेतल्याने, हे सराईत गुन्हेगार असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

काय काय गेले चोरीला ?

चोरट्यांनी घरातील २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५०० ग्रॅमचे चांदीचे तबक, चांदीचा ग्लास, २ फुलपात्रे, ६ चांदीचे सिक्के, २ वाट्या, देवांचे ठसे आणि चांदीचा करंडा असा २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT