Partur Theft News : खांडवी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या

साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास
Partur Theft News
परतूर ः तालुक्यातील खांडवी येथे चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेली महिला. (छाया ः भारत सवने)
Published on
Updated on

परतूर : तालुक्यातील खांडवी येथे शनिवार (16) रोजीच्या मध्यरात्री नंतर अज्ञात तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्या, तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

घरफोडीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह 6 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Partur Theft News
खाकी सुस्तावली अन् चोरटे सुसाट! जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी डल्ला

खांडवी येथील शेतकरी दत्ता रावसाहेब बरकुले यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे कि 15 मे रोजी रात्री आपल्या कुटुंबासह घरातील खोलीत झोपले होते. 16 मे रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी उठून बाहेर आल्या असता, त्यांना घराचे बाहेरील गेट आणि बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तातडीने पती दत्ता बरकुले यांना उठवले.

दोघांनी बाजूच्या खोलीत जाऊन पाहिले असता कपाटाचे कुलूप तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाची पाहणी केली असता त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तात्काळ शेजारी राहणारे दीपक बरकुले, विठ्ठल बरकुले आणि मारोती बरकुले यांना जागे करून घटनेची माहिती दिली आणि दिपक बरकुले यांनी परतूर पोलिसांशी संपर्क साधला असता. माहिती मिळताच परतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने गावात दाखल झाले.

याच रात्री चोरट्यांनी गावातील इतर तीन ठिकाणीही हातसफाई करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले. गावातील राजेभाऊ रामधन बरकुले यांच्या घरात घुसून चोरट्यांनी त्यांच्या झोपलेल्या आई निंलावती रामधन बरकुले यांच्या खोलीतून सोन्याचे दागिने चोरले. याशिवाय, पंढरी वसंत बरकुले यांच्या किराणा दुकानाचे आणि दत्ता तुळशीराम बरकुले यांच्या घराच्या खोलीचे कुलूप तोडून चोरी करण्याचा अपयशी प्रयत्न केला. गावात लागोपाठ घडलेल्या या प्रकारांनंतर ग्रामस्थांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रात्री 12.30 ते पहाटे 3.30 वाजेच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधलेले तीन अनोळखी इसम संशयास्पदरीत्या फिरताना आणि चोरी करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Partur Theft News
मुक्ताईनगरमध्ये भररात्री दोन चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याचे दागिने व रोख रकमेवर डल्ला

या धाडसी घरफोडीत दत्ता बरकुले यांच्या घरातून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 झुंबर जोड, 1 लाख 20 हजार रुपयांच्या 12 ग्रॅमच्या 3 सोन्याच्या अंगठ्या, 1 लाख 30 हजार रुपयांचा 13 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, 40 हजार रुपयांचे 4 ग्रॅमचे सोन्याचे 4 नग ओम, 15 हजार रुपयांचे दीड ग्रॅमचे सोन्याचे डोरले, 20 हजार रुपयांच्या दोन ग्रॅमच्या सोन्याच्या कानातील बाळ्या, 20 हजार रुपयांची दोन ग्रॅमची सोन्याची नथ, 10 हजारांची एक ग्रॅमची सोन्याची टिकली, 24 हजाराचे 160 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (4 जोड्या बांगड्या व दोन जोड चैन) आणि 70 हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तसेच, निंलावती बरकुले यांच्या खोलीतून 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कुडकं, फुल व मणी असा पाच ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले.

चोरट्यांची मारहाण

  • चोरीच्या घटने दरम्यान निलावंती रामधन बरकुले (75)यांना जाग आली. यावेळी त्यांनी चोरट्यांना विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांना मारहाण करत त्याच्या कानातील सोन्याचे फुल ओरबाडून घेतले. यामुळे त्यांच्या दोन्ही कानाना जबर जखम झाली.

  • यावेळी आरडाओरड करू नये म्हणून त्यांच्या तोंडात रूमाल कोंबून त्यांना साडीने बांधून चोरट्यांनी पळ काढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news