बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी

मुबलक पावसाचा फायदा शून्य; रब्बी हंगामात शेतकरी पाण्यावाचून चिंतित

पुढारी वृत्तसेवा

lakh liters of water wasted due to without gates at the dam

बाजार सावंगी, पुढारी वृत्तसेवा : शासनाने पाणी आडवा, पाणी जिरवाफ्फमोहिमेंतर्गत कोटी रुपये खर्चुन तालुक्यात ठिकठिकाणी कोल्हापूर प्रकारचे बंधारे उभारले. उद्देश स्पष्ट होता, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा. परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने केटीबांधांचे दरवाजे बसवण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे पावसाळ्यातील साठलेले सर्व पाणी वाहून गेले आणि अनेक ठिकाणी बंधारे कोरडे पडले आहेत. यामुळे बंधाऱ्यावर केलेले लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

खुलताबाद तालुक्यात यंदा तब्बल सहा महिने पावसाळा सुरू होता. नदी, नाले, ओढे, तलाव, धरणे आणि विहिरी पाण्याने सज्ज झाल्या होत्या. परंतु परतीच्या पावसाने खरीप हंगामाची अक्षरशः वाट लावली. उरलेसुरले पीकही पावसाने उद्ध्वस्त केले.

पाऊस थांबल्यानंतर नदीङ्कनाल्यातील पाणीही कमी होत गेले, मात्र केटी बांधावर दरवाजे न लावल्याने या साऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग झाला नाही. रब्बी हंगाम सुरू झाला असून सिंचनासाठी पाण्याची गरज वाढली आहे. पावसाळा मुबलक असतानासुद्धा पाण्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचणे ही मोठी प्रशासनिक चूक असल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. लाखो रुपयांचे बांधकाम झाले, पण दुर्लक्षामुळे त्याचा काडीचा उपयोग झाला नाही, अशी टीका होत आहे.

प्रशासनाने वेळेवर दरवाजे बसवले असते तर आज रब्बी पिकांसाठी पाण्याचे उत्तम स्रोत उपलब्ध झाले असते. परंतु हलगर्जीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांनाच बसत असल्याने शेतकऱ्यात संताप आहे.

प्रशासनाचा हलगर्जीपणा

भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी लाखो रुपयांचा खर्च करून कोल्हापुरी बंधाऱ्यांची उभारणी केली आहे. पाणी अडविण्यासाठी लोखंडी दरवाजे बसविण्यासाठी निधीची सुध्दा तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दरवाजे न बसविल्याने साचलेले पावसाचे पाणी वाहून गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT