रमाकांत बन्सोड
गंगापूर : यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या सलग तीन ते चार वेळच्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचा घरोघरी घाम गाळलेला मेहनतीचा हंगाम अक्षरशः पाण्यात गेला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम निसटला. परिणामी, आता सर्वांचे लक्ष रब्बी हंगामावर केंद्रित झाले असून, खरिपातील आर्थिक फटका भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी पिकाच्या तयारीला जोरदारपणे लागले आहेत.
तालुक्यातील काही भागांत पेरणीची प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, अनेक शेतकरी मशागतीच्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासूनचे ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे काही शेतकरी संभ्रमात आहेत. रानात अजूनही चिखल आणि ओल असल्याने पेरणीला थोडा विलंब होत आहे. यंदा खरिपात सोयाबीनच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या; परंतु सलग पावसामुळे पिके पाण्यात बुडाली.
अनेक ठिकाणी काढणीवेळीही शेतात चिखल असल्याने पीक काढणे कठीण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही आले नाही. कृषी खात्याने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन देणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या हंगामात काही शेतकरी ज्वारी, हरभरा आणि गहू या पारंपरिक रब्बी पिकांकडे वळत आहेत. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोरवेल किंवा सिंचनाची साधने आहेत, ते गहू लागवडीस प्राधान्य देत आहेत. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागांत मात्र हरभरा आणि ज्वारी ही मुख्य पिके ठरण्याची शक्यता आहे. थोडक्यात, खरिपाचा अपयशाचा कटू अनुभव मागे टाकून शेतकरी पुन्हा रब्बीच्या आशेवर उभे राहत आहेत.
हवामान स्थिर राहिले आणि पावसाचा अडथळा झाला नाही, तर रब्बी हंगामच खरिपातील जखमा भरून काढेल, अशी शेतकऱ्यांची आशा आहे. ङ्गखरिपात झालेल्या नुकसानीमुळे अनेकांचे खर्चही वसूल झाले नाहीत. रब्बी हाच आता आधार आहे. कृषी खात्याने पिकांची निवड आणि व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, फ्फअसे बगडी येथील शेतकरी बाबासाहेब जाधव यांनी सांगितले.
बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा
कृषी तज्ज्ञांच्या मते, यंदा झालेल्या अतिरिक्त पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा शिल्लक आहे. हा रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो; परंतु हरभऱ्यावर ममर रोगाचाफप्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणांची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.