

Citrus farmers are facing financial difficulties due to falling market prices
शुभम चव्हाण
छत्रपती संभाजीनगर: मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असलेला शेतकरी यंदाही वाचू शकला नाही. यंदा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर तर अक्षरशः संक्रांत कोसळली आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे मोसंबीची फळगळ झाली, तर सध्या दुसरीकडे बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
विशेषतः पैठण तालुक्यासह जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षी १० ते १५ लाख रुपये उत्पन्न देण-ारी बाग यंदा केवळ ३ ते ४ लाखांवर आली आहे. वर्षभराचा खर्चही एवढाच असल्याने लागवड टिकवणे कठीण झाले आहे. सध्या बाजारात मोसंबीला टनाला फक्त १५ ते २० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. शासनाकडून मिळणारी हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्ष नुकसान मात्र पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.