Khandesh Expressway Survey pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Khandesh Expressway : खान्देश एक्स्प्रेस वेच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सुपीक जमिनीवर महामार्गाचा घाट कशासाठी?, नाचनवेलमध्ये पथकाला शेतकऱ्यांनी पिटाळले

पुढारी वृत्तसेवा

पिशोर: शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, नैसर्गिक संकटांमुळे शेती उद्ध्वस्त होत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या सुपीक जमिनीवर महामार्गाचा घाट घातला जात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नव्याने प्रस्तावित खान्देश एक्स्प्रेस वेच्या सर्वेक्षणासाठी गुरुवारी (दि.२९) दुपारी नाचनवेल येथे दाखल झालेल्या पथकाला संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारत अक्षरशः पिटाळून लावले.

मराठवाडा आणि खान्देशला जोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते पाचोरा राज्य मार्ग क्रमांक ४८ च्या पुनर्बाधणीचे काम पूर्णत्वास येत असताना नव्याने महामार्ग उभारण्याची गरज काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या रस्त्याचा विकास करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवरून नवीन महामार्ग नेण्याचा निर्णय नेमका कोणाच्या हितासाठी घेतला जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे विस्थापन नको !

शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध नव्हे, तर विकासाच्या नावाखाली शेती आणि शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवण्याच्या प्रयत्नाला विरोध आहे, अशी भावना परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. रस्ते विकासासाठी पर्यायी मार्गाचा विचार करता येत असताना सुपीक शेतीच का निवडली जात आहे? आधीच्या रस्त्याचा विस्तार किंवा सुधारणा करण्याचा पर्याय तपासला आहे का? या प्रकल्पामुळे किती शेतकरी बाधित होणार आहेत? याची माहिती शासनाने सार्वजनिककरावी, अशी मागणी होत आहे .

ग्रामसभांचे ठराव धाब्यावर ?

कन्नड, सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेद्वारे ठराव पारित करून प्रस्तावित महामार्गाला विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सर्वेक्षणाचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शेतकऱ्यांचा संताप अनावर

गुरुवारी दुपारी एका खासगी कंपनीचे सर्वेक्षण पथक सर्वेक्षण साहित्य घेऊन नाचनवेल येथे दाखल झाले. याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचा उद्देश आणि शासनाची भूमिका याबाबत जाब विचारला. कोणत्याही परिस्थितीत या परिसरातील जमीन नव्या महामार्गासाठी देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि संतप्त वातावरण पाहून सर्वेक्षण पथकाने तेथून काढता पाय घेतला.

शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न ?

प्रस्तावित महामार्ग या परिसरातील अत्यंत सुपीक आणि बागायती जमिनीतून जाण्याची शक्यता आहे. या जमिनीवर अनेक शेतकरी पिढ्यानपिढ्या शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. भूसंपादन झाल्यास अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पडणार असून काहींवर भूमिहीन होण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमिनीचा मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांची भरपाई होऊ शकते का? बाजारभावापेक्षा कमी मोबदला मिळाल्यास शेतकऱ्यांनी पुढील आयुष्य कसे जगायचे? अशा प्रश्नांची उत्तरे शासनाने आधी द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT