RTE admission corruption pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

RTE admission corruption : 'आरटीई' कायद्याला हरताळ : विद्यार्थिनीच्या पालकाला मागितली ८ हजारांची लाच

करमाडच्या 'फिनिक्स इंग्लिश स्कूल'चा संस्थाचालक, मुख्याध्यापिका ४ हजार घेताना एसीबीच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाने राबवलेल्या 'शिक्षण हक्क कायद्या'ला एका खासगी शाळेने हरताळ फासल्याचा प्रकार करमाड येथे उघडकीस आला आहे. आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकाकडे 'शाळेची फी' म्हणून ८ हजार रुपयांची लाच मागणारे 'फिनिक्स इंग्लिश स्कूल'चे संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले. यापैकी ४ हजार रुपये स्वीकारताना दोघांना पथकाने सोमवारी (१७ ऑगस्ट) रंगेहात बेड्या ठोकल्या.

शिवाजी बाबासाहेब घुले (४४, संस्थाचालक, फिनिक्स इंग्लिश स्कूल, करमाड) आणि रेणुका रामनाथ कुबेर (३८, मुख्याध्यापिका) आरोपींची नावे आहेत, अशी या प्रकरणातील ३५ वर्षीय तक्रारदार यांची मुलगी करमाड येथील 'फिनिक्स इंग्लिश स्कूल' मध्ये शिकत आहे. विशेष म्हणजे, या मुलीचा प्रवेश शिक्षणाचा अधिकार अंतर्गत (आरटीई) झाला आहे.

शासकीय नियमानुसार, आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला शाळेची फी लागू नसते (शालेय बस, वह्या पुस्तके यांसारखे ऐच्छिक शुल्क वगळून). असे असतानाही, शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका कुबेर यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रुपये शाळेची फी भरण्यासाठी तगादा लावला होता.

तक्रारदाराला ही फी भरण्याची सक्ती केली जात होती. मात्र, आपण आरटीईअंतर्गत प्रवेश घेतला असल्याने आपल्याला कोणतीही फी लागू होत नाही, याची खात्री तक्रारदाराला होती. ही फी नसून थेट लाच मागितली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी १३ ऑगस्ट रोजी थेट एसीबी कार्यालयात धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली.

या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने त्याचदिवशी शाळेत जाऊन लाच मागणीची पडताळणी केली. त्यात मुख्याध्यापिका रेणुका कुबेर आणि संस्थाचालक शिवाजी घुले यांनी संगनमत करून तक्रारदाराच्या मुलीची 'शाळेची फी' म्हणून सन २०२५ चे ४ हजार रुपये आणि सन २०२६ चे ४ हजार रुपये, अशी एकूण ८ हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष मागितल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर अधीक्षक शशीकांत सिंगारे, प्रभारी उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक अमोल सोनवणे, प्रतिभा आबुज, पो.ह. अशोक नागरगोजे, विलास चव्हाण, सुनील बनकर, सचिन बारसे, राम गोरे आणि रामेश्वर ताटे यांच्या पथकाने केली.

रुमाल खांद्यावर टाकला अन् संस्थाचालक जाळ्यात अडकला

लाच मागणीची खात्री झाल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सोमवारी (१७ ऑगस्ट) करमाड येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्येच सापळा रचला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा होणार नाही याची पथकाने काळजी घेतली होती. ठरल्याप्रमाणे ४ हजार रुपयांची लाच संस्थाचालक शिवाजी बाबासाहेब घुले याने स्वीकारली. तक्रारदाराने रुमाल खांद्यावर टाकून नियोजित इशारा करताच एसीबीचे निरीक्षक अमोल सोनवणे यांच्या पथकाने घुलेला रंगेहाथ पकडले. त्याचवेळी मुख्याध्यापिका रेणुका कुबेर यांनाही ताब्यात घेण्यात आले. पथकाने कार्यालयातील रजिस्टर व अन्य दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी करमाड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT