इंडस्ट्रीयल ग्रीन फिल्ड आता ६१३ राज्य महामार्ग घोषित pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Bidkin Greenfield corridor : इंडस्ट्रीयल ग्रीन फिल्ड आता ६१३ राज्य महामार्ग घोषित

शेंद्रा-बिडकीन, ४६ गावांमधील सुमारे ४४० हेक्टर जमीन; एकूण ६७.८० कि.मी. लांबी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : करमाड- बिडकीन ते ढोरेगाव या महत्त्वाकांक्षी नवीन ग्रीन फिल्ड मार्गावर शासनाने अधिकृत शिक्कामोर्तब केले असून, या संपूर्ण मार्गाला आता राज्य महामार्ग क्रमांक ६१३ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गासाठी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर आणि पैठण तालुक्यातील ४६ गावांमधील सुमारे ४४० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला नवी गती मिळणार आहे.

यासंबंधी शासनाकडून नुकतीच जाहिर अधिसूचनेनुसार या नवीन ग्रीन फिल्ड महामार्ग भाग-१ : संभाजीनगर डीएमआयसी नोड क्रमांक-१ मधील करमाड ते बिडकीन असा हा ३२ किलोमीटर लांबीचा मार्ग असेल. भाग-२: बिडकीन ते थेट ढोरेगाव (पुणे-अहिल्यानगर मार्ग) असा सुमारे ३५.८० किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा महामार्ग संभाजीनगरच्या वाहतूक, उद्योग, लॉजिस्टिक्स आणि भविष्यातील शहरी विस्ताराचा पाया ठरू शकतो.

मराठवाडा, विदर्भ, जालना, परभणी या भागातून पुणे, कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी बहुतांश वाहने संभाजीनगर शहर, बीड बायपास, एनएच-५२ आणि वाळूज मार्गे जातात. त्यामुळे शहरातील औद्योगिक आणि नागरी वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. नवीन ग्रीनफिल्ड महामार्गामुळे ही वाहने शहरात प्रवेश न करता थेट बिडकीनमार्गे पुण्याकडे वळतील. त्यामुळे शहरातील जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

वेळ आणि इंधनाची मोठी बचत

सध्या शेंद्रा किंवा वाळूज औद्योगिक क्षेत्रातून पुण्याकडे जाण्यासाठी बीड बायपासमार्गे एनएच-५२ जावे लागते. हे अंतर ६४ किमी असून, या प्रवासाला वाहतुकीनुसार किमान दोन तास लागू शकतात. ग्रीनफिल्ड महामार्ग सुरू झाल्यानंतर शेंद्रा करमाड परिसरातून पुणे महामार्गावर पोहोचण्याचे अंतर सुमारे ६८ किमी असून, हा प्रवास सुमारे एक तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवाहतूक, उद्योग आणि प्रवाशांचा वेळ तसेच इंधनाची बचत होईल.

संभाजीनगरसाठी ठरेल बाह्य रिंग रोड

हा महामार्ग शहरासाठी बाह्य रिंग रोड प्रमाणे काम करेल. शेंद्रा, बिडकीन, डीएमआयसी आणि ऑरिक परिसरातून विदर्भ, उत्तर भारत किंवा पूर्व भारताकडे जाणारी वाहने शहरात न येता थेट नवीन मार्ग वापरू शकतील. तसेच जड मालवाहतूक शहराबाहेर राहिल्याने वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

या गावातील जमिनीचा समावेश

या मार्गासाठी करमाड, हिवरा, लाडगाव, टोनगाव, जडगाव, गारखेडा, आपतगाव, भालगाव, पाचोड, एकोड, चिंचोली, गाडीवाट, घारदोन, निलजगाव, पाडळी, गाझीपूर, लाखेगाव, मंगरुळ, नांदलगाव, जैनपूर, तोंडोली, गाढेगाव, शेकटा, तुळापूर वाडी, शिवपूर, पांढर ओहळ आणि तळपिंप्री या गावांमधील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत.

  • भूसंपादन आणि निधी : या रस्त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने ७४५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे.

  • प्रकल्पाचे स्वरूप : हा एक नवीन सहापदरी मार्ग असून, तो शेंद्रा-बिडकीन-ढोरेगाव औद्योगिक पट्टयाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

उद्योगांना मोठा फायदा Phulambri 3D 66 हा कॉरिडॉर ऑरिक, डीएमआयसी, शेंद्रा आणि वाळूज एमआयडीसीला अधिक प्रभावीपणे जोडेल. ज्यामुळे उत्पादन उद्योग आणि निर्यात क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढेल. वाहतूक खर्च आणि प्रवासाचा वेळ कमी झाल्याने उद्योगांना मोठा फायदा होईल. जड मालवाहू वाहतूक बाहेर वळवल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल.
अथर्वेशराज नंदावत, अध्यक्ष, सीएमआयए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT